महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन ३.० मध्ये इस्लामपूर शहराला मिळाली शिथिलता; शहर पुन्हा बहरले - islampur live again

आता झोन निहाय विभागणी झाल्यानंतर शहराला थोडीशी शिथिलता मिळाली आहे. त्यामुळे, गाड्यांचा आवाज, लोकांची लगबग यामुळे इस्लामपूर परत बहरू लागले आहे.

corona islampur
लॉकडाऊनमुळे-३ मध्ये इस्लामपूर शहराला मिळाली शिथिलता

By

Published : May 4, 2020, 5:15 PM IST

सांगली- गेल्या दिड दोन महिन्यांपासून शहरात शुकशुकाट पसरला होता. पण, शासनाने कोरोनाबाधित जिल्ह्यांना ३ झोन्समध्ये विभागले आहे. या शहरांना ४ तारखेपासून थोडी शिथिलता दिल्याने आज दिड महिन्यांनी इस्लामपूर शहर थोड्या प्रमाणात गजबजून गेल्याचे दिसून आले.

लॉकडाऊनमुळे-३ मध्ये इस्लामपूर शहराला मिळाली शिथिलता

कोरोना विषाणू संक्रमणाच्या सुरवाती काळात इस्लामपूरमध्ये बाहेरून परतलेल्या ४ लोकांना कोरोनाची लागण झाली होती आणि बघता बघता एकाच कुटुंबातील २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कायम गजबजलेले इस्लामपूर शहर एकदम शांत झाले. नगरपालिका, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग व प्रशासनाने जलद पाऊले उचलत इस्लामपूर बंदची हाक दिली व बाहेरून येणाऱ्यांसाठी प्रवेश बंद केला. मग शहरात हायड्रोक्लोरिक जंतू नाशकाची फवारणी करण्यात आली. नागरिकांनीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभाग घेतला.

यावेळी नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना घरपोच भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात आल्या. इस्लामपूर वासियांनीही प्रशासनाला कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरी राहून मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे, दिड महिन्यात एका कुटुंबाव्यतरिक्त दुसरा कोणताही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. यामुळे वाळवा तालुका हा क्रांतिवीरांचा तालुका म्हणून पुन्हा एकदा सिद्ध झाले.

इस्लामपूर शहर हे ३ तालुक्यातील गावांसाठी एक प्रकारे मुबईच आहे. तर, सांगली जिल्ह्यात इस्लामपूर या शहराला औद्योगिक व शिक्षणाचा वारसा लाभल्याने शहरात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. तर, येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. शिवाय, शहरात राजाराम बापू सहकारी साखर कारखाना व हुतात्मा सहकारी साखर कारखाना असल्याने शहराचे महाराष्ट्रभर नाव लौकिक आहे. पण, लॉकडाऊनमुळे शहरात निरव शांतता पसरली होती. मात्र, आता झोन निहाय विभागणी झाल्यानंतर शहराला थोडीशी शिथिलता मिळाली आहे. त्यामुळे, गाड्यांचा आवाज, लोकांची लगबग यामुळे इस्लामपूर शहर परत बहरू लागले आहे.

हेही वाचा-दारू दुकानांसमोर तळीरामांची गर्दी, पण रिकाम्या हातानेच परतले घरी

ABOUT THE AUTHOR

...view details