महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत अंतर्गत कुरघोड्या ठरू शकतात भाजपला डोकेदुखी! - congress sangli

विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर झाले असून महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभुमीवर सांगलीत कोण बाजी मारेल या विषयी घेतलेला आढावा....

sangli

By

Published : Sep 21, 2019, 3:24 PM IST

सांगली- काँग्रेसचा पारंपरिक गड म्हणून ओळख असणारा सांगली विधानसभा मतदारसंघ आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदारांसमोर काँग्रेस-राष्ट्रवादीचे फारसे आव्हान नाही. मात्र, उमेदवारी मागण्यावरून भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून येत असल्याने निवडणुकीमध्ये पक्षातील गटबाजी भाजपला डोकेदुखी ठरणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने सांगलीतील विधानसभा क्षेत्राचा घेतलेला आढावा


सांगली विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी दावेदारी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी अशा पक्षांची अजून उमेदवारीवरून घालमेल सुरू आहे. तर शिवसेनेने युतीत सांगलीच्या जागेवर हक्क सांगितला आहे.

सध्या सांगली विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. सुधीर गाडगीळ हे विद्यमान आमदार म्हणून सांगली विधानसभेचे नेतृत्व करत आहेत. विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर सांगलीमध्ये नेहमीच काँग्रेसचे, विशेषतः वसंतदादा पाटील घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, पैलवान संभाजी पवार यांनी दोन वेळा छेद देत वसंतदादा घराण्याबरोबरच काँग्रेसलाही धक्का दिला होता. मात्र, गतवेळच्या निवडणुकीमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे विद्यमान आमदार संभाजी पवार यांचा पत्ता कट करत भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले व सराफ व्यवसाय घराण्यातील सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिली. आणि गाडगीळ यांनी मोठ्या ताकदीने निवडणूक लढवत भाजपचा गड कायम राखून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा सांगलीचा गड संपूर्ण उ्दधवस्त केला.गेल्या पाच वर्षात सुधीर गाडगीळ यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून सांगली विधानसभा मतदारसंघात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये सांगलीची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे आणि काँग्रेसमध्ये आजही गटबाजीचे दर्शन पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील, काँग्रेसचे आमदार व प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजीत कदम, वसंतदादा घराण्यातील युवा नेते विशाल पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची गटबाजी सर्वश्रुत आहे. काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र, दोघांमध्ये कोणालाही उमेदवारी मिळाली तरी त्यांच्या पक्षात असणाऱ्या गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत याचा गटबाजीमुळे काँग्रेसला हक्काची जागा मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्षाला द्यावी लागली होती.


या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. गत विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्याने संभाजी पवार यांचे सुपूत्र पृथ्वीराज पवार यांनी शिवसेनेत प्रवेश करून याठिकाणी शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली होती. मोठे मताधिक्य २०१४च्या निवडणुकीमध्ये त्यांना मिळाले होते. मात्र, आता पवार कुटुंब पुन्हा भाजपमध्ये स्वगृही परतले आहेत. तर शिवसेनेमध्ये नव्याने दाखल झालेले काँग्रेसचे माजी नगरसेवक शेखर माने, काँग्रेस नेते व माजी ग्रामोद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर जाधव व शिवसेना शहर उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. तर भाजपचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे सांगलीच्या भाजपशी काही चांगले संबंध नाहीत. अनेक वेळा सेना-भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर सुद्धा आले आहेत. तर भाजपकडून मिळणारी वागणूक आणि मतदारसंघात असलेली पक्षाची वाढलेली ताकद यामुळे सांगलीची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी स्थानिक नेत्यांनी पक्षाकडे आग्रही मागणी केली आहे. तसेच स्थानिक भाजपला निवडणुकीत गृहीत धरू नये असा इशाराही दिला आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही मोठी ताकद आहे. मात्र, ही ताकद आघाडीतील कोणत्याही निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बाजूने आजपर्यंत राहिली नाही, हा इतिहास आहे. छुप्या पद्धतीने भाजपच्या मागे ताकद राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. आता या जिल्ह्याचे नेते असणारे जयंतराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे आघाडी धर्म पाळण्याची जबाबदारी प्रामुख्याने त्यांच्यावर असणार आहे. त्यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष असणारे जयंतराव पाटील काय भूमिका घेणार याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे लक्ष लागून आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी या मतदारसंघात अनेक वेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळ्या भूमिका घेतल्याचे आजपर्यंत पाहायला मिळाले आहे.


दुसऱ्या बाजूला या मतदारसंघांमध्ये जातीचे समीकरण पाहिले तर मराठा, जैन, ब्राह्मण, धनगर समाजाबरोबर मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून या समाजाच्या जोरावर निवडणूक लढवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. पण वंचित बहुजन आघाडीकडे भाजपला टक्कर देईल असा दमदार उमेदवार अद्याप नाही. मात्र, ऐन निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमध्ये भाजप किंवा काँग्रेस अन्य पक्षातील नाराज नेत्यांची भरती होऊन वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर विद्यमान सत्ताधारी असणाऱ्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादी, मनसे नेत्यांची झालेली भरती यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी झाली आहे. परिणामी पक्षांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या नेत्यांची कुचंबना होत आहे. आणि या निवडणुकीत उमेदवारीवरून ते पाहायला मिळत आहे. कारण भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर व राष्ट्रवादी काँग्रेसमधून दाखल झालेले माजी आमदार दिनकर पाटील त्याचबरोबर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. आणि या नेत्यांनी आपले गट निर्माण करून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने व उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. मात्र, नुकत्याच सांगलीतील महाजनादेश यात्रेमधून मुख्यमंत्र्यांनी सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. असे असतानाही भाजपमधील नाराज नेत्यांनी उमेदवारीची मागणी कायम ठेवत अप्रत्यक्ष बंडाचे निशाण फडकवले आहे. पण भाजप पक्षाची शिस्तबद्धता आणि पक्षाचा अंतिम निर्णय यावर या नेत्यांचा निर्णय अवलंबून असणार आहे.

अशा सर्व परिस्थितीमध्ये सांगली विधानसभा मतदारसंघात भाजप विरोधात विरोधकांकडे तगड्या उमेदवारांचा अभाव, त्यांच्यातील गटबाजी, यामुळे सत्ताधारी भाजपला विरोधकांचे फारसे आव्हान असणार नाही. मात्र, भाजपतमध्ये उमेदवारीवरून सुरू झालेली गटबाजी, जुन्या नेत्यांची अन्याय होत असल्याची भावना, या पार्श्वभूमीवर पक्षातून विद्यमान आमदारांना नाराजी, गटबाजी थोपवण्याबरोबर मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेची मनधरणी करणे हे डोकेदुखीचे काम असणार आहे.

एक नजर गत विधानसभा निवडणुकीतील मताधिक्यावर-
सुधीर गाडगीळ - भाजप- 80,497
मदन पाटील- काँग्रेस- 66,040
पृथ्वीराज पवार- शिवसेना- 34,500
निकाल- भाजपचे सुधीर गाडगीळ हे 14,457 मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details