सांगली -जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. 26 मे रोजी लॉकडाऊनची मुदत संपणार होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असल्याची घोषणा केली. वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन, प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सांगली जिल्ह्यात एक जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या काळात पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. 5 मे पासून जिल्ह्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. टप्प्या-टप्प्याने यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता पुन्हा 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये वाढ जिल्ह्याचा रेडझोनमध्ये समावेश
जिल्ह्यातील रुग्ण संख्या स्थिर असली तरी अद्याप साखळी तुटली नसून, पॉझिटिव्हिटी रेट 20 ते 22 टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यूदर देखील चिंताजनक आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्हा रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे प्रशासनाकडून लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. याकाळात जिल्ह्यात कडक निर्बंध असणार आहेत, असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊन काळात 'या' गोष्टींना मुभा
दरम्यान या काळात दुध विक्री केंद्रे सकाळी 7 ते 9 पर्यंत सुरु राहतील. तर किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते, पशुखाद्य यांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय शेतीविषयक सेवा व शेतीसाठी आवश्यक असणारी बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल करणारी दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार आहेत.
हेही वाचा -गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्रसह, घाट भागात पावसाची शक्यता