सांगली- या पुढील काळात कोणतेही सरकार आरोग्याच्या बाबतीत कसलीही तडजोड करणार नाही, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोरोना संकटात आरोग्य केंद्राचे महत्त्व भारतीय समाजालाच नव्हे तर संपूर्ण जगाला कळले आहे, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले. मिरज येथील आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मिरजेतील अंकली रोडवर महापालिका प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय विकास कार्यक्रमांतर्गत आयुष्यमान भारत शहरी आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या आरोग्य केंद्राचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह मिरजेतील नगरसेवक उपस्थित होते.