महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अग्रणी नदीत कृष्णामाई दाखल - कृष्णामाई

सांगली जिल्ह्यातील खानापूर घाटमाथ्यावरून वाहणाऱ्या अग्रणी नदीत कृष्णामाई अवतरली आहे. मागील कित्येक वर्षांपासून अग्रणी नदी पाण्याअभावी कोरडी पडली होती. अखेर टेंभू योजनेच्या ५ व्या टप्प्यातून कृष्णा नदीचे पाणी अग्रणी नदीत दाखल झाले आहे.

सांगली

By

Published : Apr 30, 2019, 9:53 AM IST

सांगली - वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर खानापूरच्या अग्रणी नदीत कृष्णेचे पाणी दाखल झाले आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात दुष्काळग्रस्तांनी कृष्णामाईचे स्वागत करत पाण्याचे पूजन केले. या पाण्यामुळे खानापूर घाटामाथ्यावरील दुष्काळग्रस्तांची वणवण थांबणार आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर घाटमाथ्यावरून वाहणाऱ्या अग्रणी नदीत कृष्णामाई अवतरली आहे. मागील कित्येक वर्षांपासून अग्रणी नदी पाण्याअभावी कोरडी पडली होती. अखेर टेंभू योजनेच्या ५ व्या टप्प्यातून कृष्णा नदीचे पाणी अग्रणी नदीत दाखल झाले आहे.

सांगली

खानापूर घाटमाथ्यावर टेंभू योजनेच्या भूड येथील पाचवा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कृष्णेचे पाणी येणार होते. त्यामुळे पाचव्या टप्प्याकडे संपूर्ण खानापूर पूर्व भागाचे लक्ष लागून राहिले होते. १९९७ मध्ये स्थापन झालेल्या टेंभू योजनेच्या भूड येथील पाचव्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास २०१९ उजाडले. पाचव्या टप्प्याचे काम पूर्ण होणार का? घाटमाथ्यावर पाणी येणार का? अशी साशंकता व्यक्त होत होती. मात्र, पाचव्या टप्प्याच्या कामास गेल्या सात-आठ महिन्यांपासून गती आली आणि प्रत्यक्ष पाचव्या टप्प्यावर कार्यरत यंत्रणेच्या अथक प्रयत्नाने पाचवा टप्पा पूर्ण होऊन यशस्वी झाला. गेली पाच वर्षे खानापूर घाटमाथा भीषण दुष्काळास तोंड देत आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शेती व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्व स्रोत आटल्याने अत्यंत गंभीर बनला आहे. तलाव, विहिरींबरोबर कूपनलिकांचे पाणी संपल्याने सर्व गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टँकर भरण्यासाठी जवळपास पाणी नाही.

यामुळे खानापूर घाटमाथा टेंभूच्या पाण्याकडे डोळे लावून बसला होता, जे बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झाले आहे. वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. टाळ-मृदंगाच्या गजरात दुष्काळग्रस्तांनी पाण्याचे जल्लोषात स्वागत केले.

तर या भागातील महिलांनी कृष्णेच्या पाण्याचे पूजन करून ओटी भरली. गेल्या पाच वर्षांपासून घाटमाथ्यावरील सर्वच गावांत भीषण पाणीटंचाई जाणवत असताना ‘कृष्णामाई’चे झालेले आगमन, घाटमाथ्यावरील ‘दुष्काळ’ कायमचा संपविणार असल्याची भावना लोकांमधून व्यक्त होत आहे. तर या पाण्यामुळे यामुळे नेहमी पाण्यापासून वंचित असलेल्या या भागातील अग्रणी नदी इतिहासात प्रथमच कृष्णेच्या पाण्याने वाहत आहे. यामुळे कृष्णेचे पाणी अंगणी आलेले पाहून या भागातील वयोवृद्धांचे डोळे पाणावले.

ABOUT THE AUTHOR

...view details