सांगली - सांगलीच्या मानाच्या गणपतीचे आज साध्या पद्धतीने विसर्जन सोहळा पार पडला आहे. पटवर्धन गणपती पंचायतन संस्थानकडून भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. दरवर्षी शाही मिरवणूक काढून संस्थानच्या गणपतीला निरोप देण्याची परंपरा आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोटारीतून विसर्जन पार पडले.
सांगलीच्या मानाच्या गणपतीला निरोप
गणरायाची नगरी म्हणून सांगलीची ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा होतो. सांगली संस्थानचे तत्कालीन संस्थानिक पटवर्धन सरकार यांच्याकडून गणेश उत्सवाची परंपरा सुरू करण्यात आली. मानाचा गणपती म्हणून पटवर्धन संस्थानच्या दरबार हॉल याठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. पाच दिवस गणेश उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. गणेशाची प्रतिष्ठापणा व गणरायाचे विसर्जन हे शाही मिरवणूक काढून केले जाते आणि शाही मिरवणूक पाहण्यासाठी व आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी हजारो सांगलीकर उपस्थित असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने पटवर्धन संस्थांच्या गणपती पंचायतन ट्रस्टच्यावतीने गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदाही शाही मिरवणुकीला फाटा देत मोटारीतून सांगलीकरांच्या लाडक्या आणि मानाच्या पटवर्धन संस्थानांच्या गणपतीला निरोप देण्यात आला. तत्पूर्वी पटवर्धन घराण्याचे राजे विजयसिंह पटवर्धन यांच्यासह कुटुंबाकडून आरती पार पडली. त्यानंतर शहरातील कृष्णा नदीत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.