सांगली -कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पूर टाळायचा असेल तर केंद्रीय जल आयोगाचे निर्देश पाळणे गरजेचे आहे. नाहीतर पुन्हा महापुराच्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे मत निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण व्यक्त केले आहे. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर दिवाण यांनी राज्य सरकारला काही सूचना देखील केल्या आहेत. राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागातील अभियंता म्हणून काम केलेले सांगलीतील निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी संभाव्य महापुरावरून राज्य सरकारला सूचना केल्या आहेत.
हेही वाचा -मुंबईत जोरदार पाऊस; येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता
दिवाण यांनी अभियंता म्हणून कोयना धरणापासून ते अलमट्टी धरणापर्यंत अनेकवेळा पुराच्या कारणांबाबत अभ्यास केला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्यांना महापूर आला होता. सध्या पुन्हा महापुराची धास्ती निर्माण झाली आहे. यावर्षीही महापूर आला तर कृष्णेसह सर्व नद्यांची पाणी पातळी किती राहील. महापूर आलाच तर शहरात आणि नदीकाठावरील गावांत पाणी किती दिवस थांबून राहील. संभाव्य नुकसान किती असेल? वसाहती स्थलांतरित कराव्या लागतील का? असे अनेक प्रश्न आणि शंका सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांना भेडसावत आहेत.