सांगली - अतिवृष्टीचा मोठा फटका यंदा सांगली जिल्ह्यातील निर्यातक्षम डाळिंबाला बसला आहे. दरवर्षी सुमारे 100 कंटेनर रेसिड्यू फ्री डाळिंब परदेशात निर्यात होतात. मात्र, यंदा अद्याप एकच कंटेनर डाळिंब निर्यात होऊ शकले आहे. या हंगामात जेमतेम 2 कंटेनर डाळिंब निर्यात होतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे 400 कोटींच्या आसपास फटका बसल्याचा अंदाज डाळिंब तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर, मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याप्रमाणे केंद्राने मदत करण्याची मागणी डाळिंब शेतकरी करत आहेत.
अतिवृष्टीमुळे डाळिंबाला कोट्यवधीचा फटका सर्वाधिक डाळिंब निर्यात करणारा जिल्हा युरोपियन देशांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात रेसिड्यू फ्री डाळिंबाची निर्यात होते. देशातील गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे पीक घेतले जाते. ज्यामध्ये सांगली जिल्हा हा डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यात जवळपास 20 हजार हेक्टर क्षेत्र डाळिंबाचे आहे. यामध्ये आटपाडी तालुक्यात सर्वाधिक सुमारे 8 हजार हेक्टर क्षेत्र आहे.
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी डाळिंब पीक हे वरदान आहे. दरवर्षी जिल्ह्यातून विशेषतः आटपाडी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून रेसिड्यू फ्री डाळिंबांचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यांची परदेशात त्याची निर्यात ही केली जाते. दरवर्षी सुमारे दोनशे ते अडीचशे कंटेनर देशातून परदेशात निर्यात होतात. यामध्ये सर्वाधिक वाटा सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीचा असतो. सुमारे 100 कंटेनर रेस्युड्यू फ्री डाळिंबे युरोपियन देशात निर्यात केली जातात.
हेही वाचा -नांदेडात स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग यशस्वी
100 ऐवजी यंदा केवळ 2 कंटेनर होणार रवाना
यंदा मात्र सर्वच ठिकाणी डाळिंबाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. ऑक्टोबर महिन्यात आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन डाळिंब क्षेत्र पूर्ण उद्ध्वस्त झाले. पावसाचे पाणी, फळकुज, तेल्या बिब्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे बागा संपूर्ण वाया गेल्या आहेत. दहा टक्के क्षेत्रावर डाळिंबाचे पीक आहे. मात्र, याला स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आपला डाळिंब स्थानिक बाजारात विक्री करत आहे. अतिवृष्टीमुळे माझ्या रेसिड्यू फ्री डाळिंबाचे उत्पादन जवळपास झालेले नाही. थोड्या प्रमाणातच डाळिंबाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत एकच रेसिड्यू फ्री डाळिंबांचा कंटेनर निर्यात झाला आहे आणि केवळ आणखी एक कंटेनर निर्णय होईल, अशी शक्यता आहे.
निर्यातक्षम डाळिंबाला 400 कोटींचा फटका
या निर्यातक्षम डाळिंबांच्या बाबतीत डाळिंब तज्ज्ञ आणि उत्पादक असणारे आनंदराव पाटील म्हणाले, 'जिल्ह्यासह आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब उत्पादन घेतले जाते. यात गेल्या काही वर्षांपासून रेसिड्यू फ्री डाळिंब उत्पादन घेतले जाते. युरोपियन देशात आटपाडीच्या डाळिंबाला मागणी असते. गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यातून सुमारे 100 कंटेनर डाळिंब निर्यात करण्यात आले आहे. एका कंटेनर मध्ये साधरणत: 20 टन डाळिंबे असतात. यांचा साधारणत: 180 ते 190 रुपये प्रतिकिलो इतका दर असतो. 100 कंटेनरचा हिशोब सुमारे 400 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आटपाडीच्या डाळिंबांमुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. पण यंदा अतिवृष्टीचा फटका या डाळिंबाबरोबर परकीय चलनालाही बसला आहे.
आता केंद्राच्या मदतीची गरज
पाटील म्हणाले, भारताला मोठ्या प्रमाणात आटपाडीच्या डाळिंबामुळे परकीय चलन आजपर्यंत मिळालेले आहे. आता या नैसर्गिक संकटामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारकडून 25 हजार रुपये हेक्टरी मदत मिळालेली आहे. मात्र, ही मदत पुरेशी नाही. शेतकऱ्यांच्या हक्काच्या फळपीक विमा योजनेची नुकसान भरपाई जाचक निकषांमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने परकीय चलन मिळवून देणाऱ्या आटपाडीच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करणे गरजेचे आहे. त्यांनीही राज्य सरकारच्या धर्तीवर भरीव मदत करणे आवश्यक आहे. तरच डाळिंब उत्पादक शेतकरी पुन्हा उत्तम दर्जाच्या निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेऊ शकणार असल्याचे मत व्यक्त केला आहे.
हेही वाचा -अनोखी संकल्पना: रोहयो मजुरांनी रस्त्याच्या दुतर्फा २ किलोमीटर फुलवली तूर शेती