सांगली- कृष्णाकाठी दोन अजस्त्र मगरींचे दर्शन झाले आहे. नदीत उडी घेतलेल्या एका मुलीचा शोध घेणाऱ्या बचाव पथकाला या मगरी दिसून आल्या आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कृष्णाकाठी दोन अजस्त्र मगरींचे दर्शन, पाणी पातळी वाढल्याने मगरी पात्राबाहेर..
कृष्णा आणि वारणा नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदी पात्रातील मगरी बाहेर पडू लागल्या आहेत. नदीकाठच्या शेतांमध्ये या मगरींनी आश्रय घ्यायला सुरुवात केली आहे. अशाच दोन मगरींचे दर्शन हरिपूरच्या कृष्णाकाठी झाले आहे.
कृष्णा आणि वारणा नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदी पात्रातील मगरी बाहेर पडू लागल्या आहेत. नदीकाठच्या शेतांमध्ये या मगरींनी आश्रय घ्यायला सुरुवात केली आहे. अशाच दोन मगरींचे दर्शन हरिपूरच्या कृष्णाकाठी झाले आहे. एका शेतामध्ये दोन अजस्त्र मगरी दिसून आल्या आहेत. कृष्णा नदीत एका मुलीने उडी घेतल्याचा प्रकार घडला होता. त्या मुलीच्या शोधासाठी आयुष्य हेल्पलाईन टीमकडून नदीपात्रामध्ये शोधमोहीम राबविली जात होती. या शोधमोहिमे दरम्यान बचाव पथकाला या मगरी निदर्शनास आल्या. तब्बल १२ ते १५ फुटांच्या मगरी दिसताच बचाव पथकाने शोध मोहीम थांबविली. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. नंतर वन विभागाने कृष्णाकाठच्या हरिपूर ग्रामस्थांना खबरदारीचा इशारा देत नदीकाठी न जाण्याचा सल्ला दिला. आता या मगरींमुळे हरिपूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही वर्षांपासून कृष्णेच्या नदीपात्रामधील मगरींच्या हल्ल्यांमुळे दहा जणांचा बळी गेला आहे, तर बारा जण जखमी झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून मगरींचे हल्ले रोखण्यासाठी कृष्णा आणि वारणा काठावरील मगरींचा वावर आणि वास्तव्य असणारी १७ ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये औदुंबर, सुखवाडी, अंकलखोप, धनगाव, आमणापूर, तुंग, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, ब्रम्हनाळ, चोपडेवाडी, सांगलीवाडी, सांगलीचा माईघाट, हरिपूर, मिरज कृष्णाघाट, आणि म्हैसाळ या गावातील ठिकाणांचा समावेश आहे.