सांगली- कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पूर परिसरातील महाविद्यालय व शाळांना मंगळवारी आणखी एक दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या बाजूला सांगली शहराचा पाणी पुरवठा बंद होणार आहे. तर संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने एनडीआरएफ पथकाला पाचारण केले आहे.
सांगली शहरात टिकठिकाणी पाणी साचलेआहे सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नद्यांना महापूर आला आहे. दोन दिवसांपासून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे. वाढणारी पाणी पातळी लक्षात घेऊन प्रशासनाकडून सोमवारी मिरज, वाळवा, कडेगाव आणि शिराळा तालुक्यातील महाविद्यालय व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तर, नदीकाठच्या अनेक गावांमध्ये प्रशासनाकडून नागरिकांचे, जनावरांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
कोयना धरण आणि चांदोली धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरणातून कृष्णा आणि वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग कायम आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी मिरज, पलूसशिराळा आणि वाळवा तालुक्यांमध्ये महाविद्यालय व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर संभाव्य पूर स्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण पथकाला पाचारण केले आहे. पथकाच्या तुकड्या सोमवारी रात्रीपर्यंत सांगली आणि इस्लामपूर या ठिकाणी दाखल होणार आहेत.
दुसर्या बाजूला सांगली शहरात कृष्णेला महापूर आला असून यामुळे सांगली शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य यंत्रणेचा विद्युत पुरवठा तांत्रिक कारणामुळे खंडित झाला आहे. त्यामुळे मंगळवारपासून सांगली आणि कुपवाड शहराला होणारा पाणीपुरवठा बंद होणार आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीकर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.