महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यात ऑक्सिजनची टंचाई, रुग्णांचा गुदमरतोय जीव - patients in difficulty sangli

जिल्हा प्रशासनाकडून सांगली महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली आहेत. बेडची संख्या अधिक जरी असली, तरी ऑक्सिजन वेळेवर मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. अनेक रुग्णालयांमध्ये जम्बो, ड्युरा सिलेंडरसुद्धा उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र, ऑक्सिजनची उपलब्धता आवश्यकतेपेक्षा खूप कमी आहे.

ऑक्सिजन सिलेंडर
ऑक्सिजन सिलेंडर

By

Published : Sep 15, 2020, 5:06 PM IST

सांगली- जिल्ह्यातील ऑक्सिजनची टंचाई कायम आहे. मागणीच्या निम्माच पुरवठा होत असल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे, बेड उपलब्ध असून देखील ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. तर, युद्ध पातळीवर जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत असून तो लवकर सुरळीत होईल, असे मत अन्न व औषध प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले आहे.

माहिती देताना पालकमंत्री जयंत पाटील

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, ऑक्सिजनची कमतरता असल्याने अनेक रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडून सांगली महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली आहेत. बेडची संख्या अधिक जरी असली, तरी ऑक्सिजन वेळेवर मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. अनेक रुग्णालयांमध्ये जम्बो, ड्युरा सिलेंडरसुद्धा उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र, ऑक्सिजनची उपलब्धता आवश्यकतेपेक्षा खूप कमी आहे.

जिल्ह्यात सध्या ३८ ते ४० टन ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, मागणीच्या निम्मा पुरवठा होत आहे. सुरुवातीला कोल्हापूर, पुणे या ठिकाणांहून ऑक्सिजन उपलब्ध होत होता. मात्र, त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातून ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आहे. कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने तिथल्या प्रशासनाने ऑक्सिजन जिल्ह्यातच वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता सांगली जिल्ह्यात मुख्यतः पुणे, रायगड, रत्नागिरी, सिन्नर तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव आणि गुलबर्गा येथून ऑक्सिजन पुरवठा होत आहे. तरीही ऑक्सिजन कमी पडत आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यू हा देशात सर्वाधिक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७०० हून अधिक रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहेत. जिल्ह्यातील मृतांचा टक्का हा ४ टक्के इतका आहे. यामधील बहुतांश रुग्ण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्युमुखी पडले आहेत. असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केला. तसेच, जिल्ह्याची गरज ही जवळपास ४० टन ऑक्सिजनची आहे. मात्र, प्रत्यक्षात कमी ऑक्सिजन जिल्ह्याला मिळत आहे. परिणामी, कोरोना रुग्णांना किंवा इतर रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही व ते रुग्णालयात मरतात. असे मत खराडे यांनी व्यक्त केले.

राज्यात ऑक्सिजनची मोठी कमतरता असल्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी वारंवार स्पष्ट केला आहे. आणि या स्थितीमध्ये सरकार ऑक्सिजन अधिकाधिक कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल यासाठी प्रयत्न करत असल्याचेही खराडे यांनी स्पष्ट केले. तर, औद्योगिक क्षेत्रातला ऑक्सिजन पुरवठा शासनाने जवळपास बंद केला आहे. आणि तो सगळा पुरवठा हा रुग्णालयांकडे वळवण्यात आला आहे. मात्र, वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यांना भासणारी ऑक्सिजनची गरज याचा विचार करता ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची कबुली पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

सांगलीच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एन.पी. भांडारकर यांच्या मते, जिल्ह्यात आता ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत आहे. मध्यंतरी ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. जिल्ह्याला प्रामुख्याने कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणांहून नियमितपणे ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होता आणि सध्या कोरोना काळामध्ये मागणीही वाढली. पण, दुसऱ्या बाजूला ऑक्सिजनची कमतरता नाही, पण वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑक्सिजन वाहतूक करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे टँकर्स लागतात. त्यांची संख्या कमी असल्याने हा पुरवठा होण्यामध्ये अडचण निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

तसेच, ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आहे. राज्यातील पालघर आणि गुजरात या ठिकाणी गॅस सिलेंडर निर्मिती कंपन्या आहेत. पण, त्या ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक सिलेंडरची मागणी आहे. त्यामुळेच, सिलेंडर निर्मितीचाही प्रश्न आहे. मात्र, आता सरकारने एफडीआयच्या माध्यमातून ऑक्सिजन उत्पादन, तसेच पुरवठा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. त्यामुळे, हा प्रश्न लवकरच सुटेल. त्याचबरोबर, जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास सहाय्यक आयुक्त भांडारकर यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील ऑक्सिजन गरज या प्रमाणे...

-जिल्ह्यातील जवळपास ६०० हून अधिक रुग्णांना ऑक्सिजनची गरज.

-प्रति मिनिट ३६ हजार लिटर ऑक्सिजनची गरज.

-तासाला २१ लाख ६० हजार लिटर ऑक्सिजनची गरज.

-जिल्ह्यात रोज ६ केएलच्या ६ कंटेनरची गरज. (१ केएल म्हणजे १ लाख लिटर)

सांगली जिल्ह्यातील सध्याची कोरोना स्थिती..

-अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या- ९ हजार ३४१

-जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या- २४ हजार ३९

-आतापर्यंत १३ हजार ८०५ जण कोरोना मुक्त

-आजपर्यंतची कोरोनाबाधित मृत्यू संख्या- ८९३

-सध्याच्या घडीला ९७९ रुग्ण हे अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.

हेही वाचा-..अन्यथा सांगलीत पुन्हा लॉकडाऊन हाच पर्याय - जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details