सांगली- जिल्ह्यातील दुष्काळी भागात गेल्या दोन आठवड्यापासून परतीच्या पावसाचा ठिय्या कायम आहे. यामुळे नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे अग्रणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर काही ठिकाणचे लहान पूल पाण्याखाली गेले आहेत.
सांगलीत परतीच्या पावासाचा कहर हे वाचलं का? - कल्याण शहरासह ग्रामीण परिसराला परतीच्या पावसाने झोडपले; अनेक घरांचे नुकसान
खानापूर, तासगाव, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या तालुक्यातील ओढे, नाले आणि नदी दुथडी भरून वाहत आहेत, तर गेल्या दोन दिवसांपासून चारही तालुक्यात धुवाधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तासगावचा सिद्धेवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. सावळज, वज्रचौंडे, गव्हाण तसेच कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव हद्दीत अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. गेल्या दोन दिवसात तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वायफळे, बिरणवाडी, सिद्धेवाडी, दहिवडी,सावळज, अंजनी, गव्हाण, वडगाव, नागेवाडी या गावांना पावसाने झोडपून काढले आहे.
हे वाचलं का? -पुण्याला परतीच्या पावसाने झोडपले; रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीची कोंडी
गुरुवारी सावळज परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच अग्रणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याला प्रचंड वेग असल्यामुळे हिंगणगाव, मोरगाव, देशिंग, धुळगाव परिसरातील नागरिकांनी सदर पुलावरून वाहतूक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे खानापूर भागात करंजेहून रामनगरमध्ये येणारा रस्ता बंद झाला असून अग्रणी नदीच्या पुलावर जवळपास 4 ते 5 फूट पाणी साचले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव, मोरगाव, अग्रण धुळगाव, मळणगाव येथील पूल पाण्याखाली गेले आहेत, तर लोणारवाडी येथील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे या पुलावरून न जाण्याचा सूचना प्रशासनाकडून देण्यात आले.