सांगली -सांगली-मिरज शहरासह जिल्ह्यामध्ये गुरुवारी जोरदार अवकाळी पाऊस (Heavy Rainfall in Sangli Miraj) आणि गारपीट झाली आहे. वादळी वाऱ्यासह सांगली आणि मिरज शहर परिसरामध्ये धुवाधार पाऊस पडला आहे. तर पलुस तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह प्रचंड गारपीट झाली आहे. त्यामुळे द्राक्षबाग शेतीला मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्याला अवकाळीबरोबर गारपीटचा तडाखा -सांगली शहरासह जिल्ह्याला गुरुवारी 28 एप्रिल रोजी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. पलुस तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह प्रचंड गारपीट झाली आहे. तर सांगली मिरज शहर परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातल्या अनेक भागातही अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली.
अवकाळीने शहराला झोडपून काढले -गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे तापमान 42 डिग्री पर्यंत पोहचले होते. परिणाम सांगलीकर उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, गुरुवारी दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहर परिसरात सुमारे अर्धा तास अवकाळी पाऊस पडला. त्यानंतर सायंकाळपर्यंत सांगली-मिरज शहरामध्ये अवकाळी पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे शहरातल्या अनेक सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
गारांचा पाऊस आणि बागेत खच - पलूस तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. गारांचा पाऊस देखील पडला आहे. तालुक्यातील नागठाणे, संतगाव, अंकलखोप परिसरात प्रचंड गारपीट झाली आहे. गारांचा पडलेला पाऊस त्यामुळे द्राक्ष शेतीला मोठा फटका बसला आहे. या गारपिटीमुळे द्राक्ष बागांमध्ये गारांचा खच पडलेला पाहायला मिळाला. द्राक्ष शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.