सांगली- चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासात परिसरात 165 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. तसेच, या भागात सलग 3 दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे, धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. म्हणून धरणाचे चारही दरवाजे उघडून 3 हजार क्युसेक्स पाण्याचा वारणा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
वीज निर्मिती केंद्रातून 1 हजार 400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात 22 हजार 120 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक यामुळे गेल्या 24 तासात धरणाची पाणीपातळी 2 मीटरने वाढली आहे. मुसळधार पाऊस तसेच धरणातील मुख्य दरवाजातून आणि वीज निर्मिती केंद्रातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे.