महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परतीच्या पावसाने द्राक्ष बागयतदारांचे मोडले कंबरडे, कोट्यवधी रुपयांचे नुकसान - सांगलीतल्या शेतकऱ्यांना पावसाचा फटका

द्राक्षनगरी समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला असून, कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

परतीच्या पावसाने द्राक्षबाग शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

By

Published : Nov 1, 2019, 6:49 PM IST


सांगली -द्राक्षनगरी समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला असून कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळाली नाही, तर द्राक्षबाग शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नसल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.


महाराष्ट्रात नाशिक पाठोपाठ सांगलीला द्राक्षनगरी म्हणून ओळखले जाते. येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष शेतीमध्ये सातत्याने नवनवे प्रयोग करून द्राक्ष शेतीला संपूर्ण जगात नावारुपाला आणले. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे थोड्या फार प्रमाणात येथील द्राक्ष शेतीला फटका बसत असतो. मात्र, त्यावर मात करत या भागातील शेतकरी मोठ्या हिंमतीने द्राक्षबाग जगवण्याचे काम करतो. यंदा मात्र परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील विशेषतः तासगाव आणि मिरज तालुक्यातील द्राक्ष शेती पुरती उद्ध्वस्त झाली आहे. जिल्ह्यात एकूण दीड लाखाहून अधिक द्राक्षबागेचे क्षेत्र आहे. तासगाव आणि मिरज तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र आहे.

परतीच्या पावसाने द्राक्षबाग शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे


द्राक्ष बागांची साधारणपणे सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत छाटणी उरकण्याची वेळ आहे. या वेळेनुसार जवळपास 90 टक्के छाटणीची कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली होती. मात्र, यावर परतीच्या पावसाने पाणी फिरवले आहे.

सप्टेंबरमध्ये छाटणी झालेल्या बागांना मणीघड तयार झाले होते, तर ऑक्टोबर छाटणीच्या बागांना पालवी फुटत होती. मात्र, परतीच्या पावसाने ही सर्व प्रक्रिया संपवली आहे. मोठ्या प्रमाणात मणीघड गळून पडले आहेत, तर बागेवर पाणी साचून कुज सुरू झाली आहे. त्याचबरोबर पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगावर नियंत्रण मिळवणे ही पावसामुळे अशक्य झाले आहे. कारण बागांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचून असल्याने फवारणी करणारे ट्रॅक्टर चिखलात रुतून बसले आहेत. क्षेत्र मोठे असल्याने शेतकऱ्यांना हाताने फवारणी करणे अवघड बनले आहे.

छाटलेल्या बागांचा माल जानेवारी- फेब्रुवारीत सुरू होणार असल्याने त्यांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. दरवर्षी साधारणत 15 ऑक्टोबरपासून हवामान आधारीत फळपीक विमा लागू होतो. पण यंदा शासनाने याबाबतचा आदेश अद्यापही काढलेला नाही. याचा सर्वात मोठा फटका बागायतदारांना बसणार आहे. जीआर प्रसिद्ध झाला असता तर सध्याच्या संकटाच्या काळात बागायतदारांना काहीसा लाभ झाला असता. शासनाच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

एक नजर जिल्ह्यातील द्राक्ष क्षेत्रावर...

सांगली जिल्हयातील द्राक्ष बागेचे एकूण क्षेत्र - १.५ लाख एकर
तासगाव तालुका - 40 हजार एकर
मिरज तालुका - 35 हजार एकर
पलूस-कडेगाव तालुका - 13 हजार एकर
वाळवा तालुका - 4 हजार एकर
खानापूर-आटपाडी तालुका - 4 हजार एकर
कवठेमहांकाळ आणि जत तालुका - 4 हजार एकर


या सर्व तालुक्यांना यंदा कमी-अधिक प्रमाणात पाऊस, ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. निर्यातक्षम द्राक्ष असो किंवा बेदाणा उत्पादन यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यावेळी मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. तर यासर्व पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने या द्राक्षबाग शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला नाही, तर गळ्याला फास लावण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहणार नाही ,असे मत शेतकरी व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details