सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणारी हज कमिटीची शिबिरे तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती हज कमिटीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी दिली. तसेच हज यात्रा रद्द होणार नसून १० जून रोजी महाराष्ट्रातून पहिले विमान हजसाठी रवाना होणार आहे. तोपर्यंत सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास सिद्दिकी यांनी व्यक्त केला आहे.
सांगलीच्या खिदमत हुज्जाज कमिटी तर्फे बैठकीचे आयोजन करण्याता आले होते. या बैठकीत त्यांनी सदर माहिती दिली. राज्यातून हज २०२० साठी जाणाऱ्या यात्रेकरूंना आजपासून हज कमिटीकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिबिरांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील प्रशिक्षण शिबिरे रद्द करण्यात आल्याची माहिती आज हज कमिटीचे अध्यक्ष हाजी जमाल सिद्दिकी यांनी दिली आहे. सर्व यात्रेकरूंना आम्ही ऑनलाइन पद्धतीने माहिती देण्याचे काम सुरू केले आहे, तसेच यंदाची हज यात्रा रद्द होणार अशा अफवा पसरवल्या जात आहे. पण, तूर्तास उमराह ही यात्रा रद्द केली आहे, मात्र हज यात्रा अजून रद्द केली नसल्याचे सिद्दिकी यांनी सांगितले.