सांगली- जिल्ह्यातील पूरस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. त्यासाठी प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. गरज पडल्यास मदतीसाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करण्यात येईल. पूरग्रस्तांनी घाबरू नये, त्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे आहे, असे पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले. देशमुख यांनी सोमवारी पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नद्यांना महापूर आला आहे. नदीकाठच्या अनेक गावांना पुराचा वेढा घातला आहे. या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे. जिल्हा आणि सांगली महापालिका प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांमध्ये मदतकार्य युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. त्यांनी यावेळी पलूस तालुक्यातील भिलवडी, आमनापूर, धनगाव यासह सांगली शहरातील मगरमच्छ कॉलनी परिसरात भेट दिली. तेथील परिस्थितीचा आढावा घेत पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आहे.