सांगली - सांगली मतदारसंघासाठी युतीने भाजप खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिवसेनेत त्यांना समर्थन देण्यावरून दोन गट तयार झाले आहेत. अधिकाराचा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख संजय विभूतेंच्या गटाने, दुसऱ्या गटावर परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप केला आहे. तर विभूतेंच्या गटाची भूमिका युतीच्या उमेदवाराविरोधात असल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केला आहे. या दोन्ही गटाने एकमेकांच्या हकालपट्टी करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.
सांगलीत भाजप उमेदवार संजय पाटलांच्या समर्थनावरून शिवसेनेतच जुंपली; सेनेत गटबाजीला उधाण - sanjay vibhute
अधिकाराचा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख संजय विभूतेंच्या गटाने, दुसऱ्या गटावर परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप केला आहे. तर विभूतेंच्या गटाची भूमिका युतीच्या उमेदवाराविरोधात असल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केला आहे
सांगली लोकसभेची जागा शिवसेनेकडून लढण्याबाबत तयारी सुरू होती. या जागेबाबत स्थानिकांनी पक्षाकडे मागणीही केली होती. मात्र, जागा वाटपात ही जागा भाजपच्या पदरात पडल्याने भाजपने खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली. या उमेदवारीला समर्थन देण्याबाबत शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे.
जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या गटाने युतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या विरोधात काम करण्याची भूमिका घेतल्याचा आरोप शहर शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या रावसाहेब घेवारे, अनिल शेटे गटाने जिल्हा प्रमुख यांच्या हकालपट्टीची मागणी करत शिवसेनेकडून युती धर्म पाळण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
यानंतर जिल्हा प्रमुख संजय विभूते गटाने देखील पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडन केले. संजयकाका यांच्याबाबत पदाधिकाऱयांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत मंत्री दिवाकर यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. सांगलीमध्ये सोमवारी संजयकाका पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर नाराजी दूर होईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. संजयकाका पाटील यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रश्न नसल्याचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी स्पष्ट केले आहे. ज्या लोकांना हे आरोप केले आहेत. ते कोणत्याही पदावर नसून केवळ पाकिटमारी करणारी टोळी असल्याचा आरोप यावेळी केला.