सांगली : शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरात शासकीय कर्मचारी रस्त्यावर उतरत आहेत. शासकीय कर्मचारी, शिक्षक कर्मचारी चरणी जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सांगलीत धडक मोर्चा काढला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातून भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आला. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या पुष्पराज चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. राम मंदिर, राजवाडा चौक आणि स्टेशन चौक असा हा मोर्चा निघाला. त्यानंतर या मोर्चाचे स्टेशन चौक या ठिकाणी सभेमध्ये रुपांतर झाले.
कर्मचाऱ्यांनी दिला इशारा :सांगली जिल्ह्यातील जवळपास 200 हून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला होता. साधारणतः वीस ते पंचवीस हजार कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये 'एकच मिशन, जुनी पेन्शन' असा नारा देण्यात येत होता आणि आता ही आरपारची लढाई असल्याचा इशारा देखील या मोर्चेकर्यांनी यावेळी दिला आहे. या मोर्चामध्ये शासकीय कर्मचारी पुरुष, महिला व सर्वांनीच डोक्यांवर टोप्या घातल्या होत्या आणि ज्यावर 'एकच मिशन,जुनी पेन्शन' असा मजकूर लिहिला होता. तसेच काही कर्मचाऱ्यांनी उंटावर बसून या मोर्चात सहभाग नोंदवला होता.
या नेत्यांची उपस्थिती : काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अरुण लाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.