सांगली -महाविकास आघाडी सरकारकडून मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. या विरोधात 25 मेपासून मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे. ते सांगलीच्या विटा याठिकाणी बोलत होते.
'पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा अध्यादेश मागे घ्या, अन्यथा 25 मेपासून मंत्रालयासमोर ठिय्या' मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्यावर सरकारकडून अन्याय -
याबाबत आमदार पडळकर म्हणाले, की राज्य सरकारकडून गेल्या 4 महिन्यात मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या असणाऱ्या पदोन्नती 3 वेळा रद्द करण्यात आली आहे. हा बहुजन समाजातील मागासवर्गीय अधिकारयांच्यावर अन्याय करणारा प्रकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या पदोन्नतीला उच्च न्यायालयात स्थगिती मिळाली, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी 30 टक्के आरक्षण राखीव ठेवून बाकीचे आरक्षण दिले होते. मागसवर्गीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचे अधिकारी कायम ठेवले होते. मात्र, आघाडी सरकारने मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या हक्काच्या पदोन्नती रद्द केल्या आहेत. कारण महाविकास आघाडी सरकारला आपल्या मर्जीतील अधिकारी त्याठिकाणी बसवून वसुली करायची आहे, असा आरोप पडळकर यांनी केला आहे.
'अध्यादेश रद्द करा, अन्यथा 25 मे पासून आंदोलन' -
आघाडी सरकारने मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या विरोधात जो अध्यादेश काढला आहे, तो तातडीने रद्द करावा अन्यथा 25 मे पासून आपण मंत्रालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करणार आहे. कोरोनाच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे.