सांगली -राज्यात ब्राह्मण विरुध्द ओबीसी असा वाद लावण्याचे षड्यंत्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून करण्यात असल्याचा आरोप आरोप धनगर समाजाचे व भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच भाजपमध्ये बहुजन नेतृत्वाला डावलले जात नाही, उलट संधी दिली जाते. त्यामुळे एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची नाराजी ही पक्षांमधील ज्येष्ठ मंडळी बसून दूर करतील, असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. ते आज (गुरुवार) सांगलीमध्ये बोलत होते.
राज्यातील भाजपमध्ये ओबीसी व बहुजन नेत्यांना डावलण्यात येत असल्याची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ खडसे, विनोद पंकज, चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे हे नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, ही सर्व जाणीवपूर्वक पासरवलेली अफवा आसल्याचे मत भाजप व धनगर आरक्षणाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले आहे. राज्यात याआधी ब्राह्मण विरुद्ध दलित, ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद आणि आता ब्राह्मण विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे षडयंत्र असून सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडून हे करण्यात येत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला.