सांगली - संचारबंदी, प्रचंड पोलीस फौजफाटा याला न जुमानता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन भाजपाच्यावतीने करण्यात आले ( Ahilyabai Holkar memorial inauguration ) आहे. थेट ड्रोनद्वारे अहिल्यादेवी होळकर स्मारकावर पुष्पवृष्टी करत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्मारकाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले ( Gopichand Padalkar Inaugurated Ahilyadevi Holkar Memorial ) आहे. त्यामुळे सकाळपासून सांगली शहरात निर्माण झालेला तणाव निवळला आहे.
स्मारक उदघाटवरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा : सांगली, मिरज आणि कुपवड शहर महानगरपालिकेच्यावतीने अडीच कोटी रुपये खर्चून, सांगलीमध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. या स्मारकाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाला होता. महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, हा कार्यक्रम सर्वपक्षीय नसल्याचा आरोप करत भाजपाने याला विरोध दर्शवला . 27 मार्च रोजी धनगर समाजातील मेंढपाळा बांधवांच्या हस्ते उद्घाटन करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले होते.
स्मारक परिसरात संचारबंदी आणि तगडा बंदोबस्त : यामुळे मोठा वाद निर्माण होऊन, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून 25 मार्च पासून 2 एप्रिलपर्यंत अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरामध्ये 144 कलम लागू करत संचारबंदीत जाहीर करण्यात आली. तर रविवारी 27 मार्च रोजी उद्घाटन होणारच असा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर आज रविवारी सकाळपासून प्रचंड पोलिस बंदोबस्त स्मारकाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर स्मारकाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करत, संपूर्ण परिसर पत्र्याचे बॅरिकेट लावून सील करण्यात आला होता. स्मारकाच्या ठिकाणी कोणीही येऊ नये, यादृष्टीने प्रचंड घेराबंदी पोलीस प्रशासनाच्यावतीने अहिल्यादेवी स्मारकाच्या परिसराला करण्यात आली होती. जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे सांगली शहरांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता.