सांगली - काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी महाविकास विकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून भाजपचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तसेच काँग्रेस मंत्र्यांनी सत्तेची लाचारी नाकारून सत्तेवर लाथ मारावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सांगलीच्या झरे याठिकाणी ते बोलत होते.
सोनियांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र..
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किमान सामना कार्यक्रमाची आठवण करून पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये अनुसूचित जाती-जमाती यांच्या रिक्त जागा लवकर भराव्यात, आदिवासी विकास योजनांना आवश्यक तो निधी देऊन यासंदर्भातील कार्यवाही करावी, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशा प्रमुख मागण्या आपल्या पत्राद्वारे केल्या आहेत.
सर्व समूहांवर अन्याय करणारे सरकार..सोनिया गांधी यांच्या पत्रानंतर महाविकास आघाडी सरकारवर भाजपाकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. भाजपचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे. आमदार पडळकर म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय समाजावर अन्याय करत आहे, हे आपण वेळोवेळी निदर्शनास आणून दिले, नोकरभरती असेल, शिक्षक भरती असेल त्याठिकाणी अन्याय करण्यात आले आहे. महावितरण कर्मचाऱ्यांची भरतीमधील मुलांना अजून नियुक्त्या दिल्या नाहीत. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलणे, बार्टी सारख्या संस्थेला निधी न देणे, अशा अनेक गोष्टींकडे महाविकास आघाडी सरकारने एक वर्षात दुर्लक्ष करून सर्व समूहांच्यावर अन्याय केला आहे.
आता, तरी काँग्रेस मंत्र्यांनी सत्तेवर लाथ मारावी..काँग्रेसच्या हायकमांड असणाऱ्या सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. किमान समान कार्यक्रम महाराष्ट्रात राबवला जात नाही, आदिवासी, अनुसूचित जाती- जमाती नोकर भरती असेल किंवा त्यांना निधी देणे असेल त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतंय, ही बाब सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे त्यांनी हे पत्र पाठवले आहे. राज्यातील काँग्रेस मंत्र्यांनी आता तरी जागे झाले पाहिजे व सत्तेचे लाचारी नाकारून,सत्तेवर लाथ मारून समाजासाठी काम केले पाहिजे.
सरकारच्या नाकर्तेपणाची पोचपावती..तसेच किमान समान कार्यक्रम हा महाविकास आघाडी सरकारला सांगता आला नाही, तो राज्यात नावापुरते राहिला. त्याच्यावर काम झाले नाही. त्यामुळे आपण वारंवार हे महाविकास आघाडीचं सरकार दलित, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे. हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो, मात्र आता सोनियाजी गांधींनी पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती देत माझ्या मागण्यांना पुष्टी दिली आहे, असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले आहे.