सांगली - राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. पूर्ववैमनस्यातून 40 लाखांची सुपारी देऊन ही हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सांगली पोलिसांनी चौघांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस सुहेल शर्मा यांनी दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव गजानन पाटील यांचे बंधू आणि पलूस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या हत्या प्रकरणचा 8 दिवसानंतर छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. दि. 2 फेब्रुवारी रोजी पलूसच्या खटाव येथे आनंदराव पाटील यांच्या हत्येची घटना घडला होती. यामुळे जिल्ह्यातील खळबळ उडाली होती.
हेही वाचा - खून का बदला खून? राष्ट्रवादी नेत्याच्या हत्ये प्रकरणी शिवसेना उपजिल्हाप्रमुखासह तिघांना अटक
या प्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गतीने तपास करत खुनाचा छडा लावला आहे. 40 लाख रुपयांची सुपारी देऊन आनंदराव पाटील यांचा खून झाल्याचे उघडकीस आणले आहे. वैयक्तिक वादातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या हत्या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.