सांगली - केंद्र सरकारने शहाणपणाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवावा अन्यथा देशात 'अराजकता' निर्माण होईल, असा इशारा स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना जर कायदा नको, असेल तर कशाला लादत आहात, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. कृषी कायद्याविरोधात सांगली मध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
अन्यथा देशात अराजकता माजेल - राजू शेट्टी शेतकरी आणि सामान्यांची होणार लूट...केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या 27 दिवसांपासून सांगलीमध्ये किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने "किसान बाग" आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगली मधील स्टेशन चौक या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये कृषी कायद्याच्या विरोधात जाहीर सभा पार पडली. माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्थानिक शिवसेना काँग्रेस नेत्यांसह तर सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या सभेला उपस्थिती लावली होती. सभेमध्ये बोलताना राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांची, कशी लूट होईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सरकारकडून केवळ भांडवलदारांच्या फायद्यासाठी हे कायदे राबवण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप राजू शेट्टी यांनी केला.
अन्यथा देशात अराजकता माजेल...दिल्लीमध्ये आज पंजाब, हरियाणा सह देशातले अनेक शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर हे कायदे नको असतील तर, हे कायदे कशासाठी करण्यात आले आहेत, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. पंजाब प्रांतांमध्ये 1980 च्या दशकात व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मध्ये शेतीमालाच्या मुद्द्यावरून रक्तरंजित इतिहास घडला होता आणि त्यातून देशाला पंतप्रधान गमवावा लागला होता, हा इतिहास आहे. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती व्हायची नसेल तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा देशांमध्ये अराजकता माजेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांच्या बरोबर सर्वसामान्यांनीही एकजूट होऊन विरोध केला पाहिजे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.