सांगली -केंद्रीय पथकाने पूरग्रस्तांची थट्टा केली आहे. शेतकऱ्यांना भात लावणीचा सल्ला देणे म्हणजे केंद्रीय पथकाचा अतिशहाणपणा आहे. जिथे १० फुटाचा ऊस पाण्याखाली गेला तिथे २ फुटाचा भात कसा कसा राहील? पथकाला एवढी तरी अक्कल पाहिजे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय पथकावर निशाणा साधला. ते आज सांगलीमध्ये बोलत होते.
केंद्रीय पथकाला एवढी तरी अक्कल पाहिजे, राजू शेट्टी भडकले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
केंद्रीय पथकाने पूरग्रस्तांची थट्टा केली आहे. शेतकऱ्यांना भात लावणीचा सल्ला देणे म्हणजे अति शहाणपणा आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय पथकावर निशाणा साधला.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात आलेल्या पूरग्रस्त भागात आज केंद्रीय पथकाने पाहणी केली. त्या दौऱ्यावर शेट्टी यांनी जोरदार टीका केली. केंद्राचे पथक वास्तविक पूर ओसरल्यानंतर तातडीने पाहणी करण्यासाठी येणे अपेक्षित होते. मात्र, पंधरा दिवसांनी उशिरा आलेल्या या पथकाला महापुरातील नुकसानीची भीषणता काय जाणवणार, असा प्रश्नही यावेळी त्यांनी केला.
केंद्रीय पथकाने साताऱ्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भात शेती करण्याचा सल्ला दिला. यावर बोलताना शेट्टी म्हणाले, की ज्या ठिकाणी दहा फुटाचा ऊस पाण्याखाली गेला, त्या ठिकाणी दोन फुटाचे भात पीक कसे राहील. एवढीसुद्धा अक्कल नाही? असा हल्लाबोल त्यांनी केला. पथकाने पूरग्रस्त शेतकऱ्यांची आणि जनतेची थट्टा केल्याची टीका यावेळी राजू शेट्टी यांनी केली.