महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन - bjp leader sambhaji pawar

चार वेळा सांगलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संभाजी पवार यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांचा नेता हरवल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातून उमटत आहे. त्यांच्या पार्थिवावर सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमी येथे दुपारी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन
माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन

By

Published : Mar 15, 2021, 9:21 AM IST

सांगली : माजी आमदार व भाजपाचे जेष्ठ नेते पैलवान संभाजी पवार यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर राजकीय, सामाजिक क्षेत्रातून दुःख व्यक्त होत आहे.

दुपारी अंत्यसंस्कार

चार वेळा सांगलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संभाजी पवार यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांचा नेता हरवल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातून उमटत आहे. त्यांच्या पार्थिवावर सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमी येथे दुपारी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे. गरिबांचा नेता म्हणून संभाजी पवार यांची ओळख होती. गेल्या काही वर्षांपासून ते आजाराने त्रस्त होते. गेल्या वर्षी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र कोरोनावर मात करून ते पूर्णपणे बरे झाले होते.


बिजलीमल्ल म्हणून होती ओळख
सांगलीच्या राजकारणात सर्वसामान्यांचा नेता आणि बिजलीमल्ल म्हणून पै. संभाजी पवार यांची ओळख होती. वसंतदादा घराण्याचे कट्टर विरोधक म्हणूनही राज्यात संभाजी पवार यांना ओळखलं जात होते. वज्रदेही मल्ल हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख होती. पण त्याहूनही कुस्त्या क्षणार्धात निकाली लावायची त्यांची खासियत होती. त्यामुळे त्यांना बिजलीमल्ल म्हणून ओळखलं जायचं. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण केला होता. त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हयातीत सांगली विधानसभा निवडणूक लढवून वसंतदादा पाटील यांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांचा पराभव करत जायन्ट किलर, अशी ख्याती मिळविली होती. त्यानंतर 4 वेळा संभाजी पवार यांनी सांगलीचा आमदार म्हणून नेतृत्व केलं.

4 वेळा सांगलीचे आमदार
जनता दल ते भाजप असा पवार यांचा राजकीय प्रवास राहिला. जनता दलाचे 3 वेळा आमदार व भाजपाचे 1 वेळा आमदार म्हणून त्यांनी काम केलं. तसेच जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. 2009 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सांगलीत त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याशी संभाजी पवार यांचे अत्यंत जवळचे संबंध राहिले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणूनही संभाजी पवार यांची ओळख होती. मात्र 2014 मध्ये पक्षांतर्गत नाराजीमुळे संभाजी पवार यांनी भाजपाला रामराम करत सक्रीय राजकारणापासून अलिप्त राहणं पसंत केलं होतं.

ABOUT THE AUTHOR

...view details