सांगली -राजकीय पक्ष हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी अनेक सेलिब्रिटींची 'स्टार प्रचारक' म्हणून मदत घेत आहेत. महाआघाडीचे उमदेवार असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रचारालाही दक्षिणेतील सुपरस्टार प्रकाश राज येणार आहेत.
बॉलिवूड व टॉलीवुडचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज १९ एप्रिलला हातकणंगले मतदार संघात सभा घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. प्रकाश राज हे लोकशाही वाचवण्याचे सभेतून आवाहन करणार आहेत. अनेक बुद्धिवादी आणि कलावंतानी पुढे यायला पाहिजे, असे त्यांनी मत व्यक्त केले. मोदी यांच्या हुकुमशाहीविरोधात प्रकाश राज यांनी आवाज उठविला आहे. मोदींनी त्यांना त्रास दिल्याचा दावा शेट्टी यांनी केला.
प्रकाश राज हे भाजपच्या विरोधात कर्नाटकच्या बंगळुरू मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी तेथील प्रचार संपल्याबरोबर नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढणाऱ्या डाव्या आणि शेतकरी संघटनांच्या चळवळीतील उमेदवारांच्या प्रचारालाही उपस्थिती लावण्यास सुरुवात केली आहे.
असे आहे राजू शेट्टी आणि प्रकाश राज यांचे 'कनेक्शन'
राजू शेट्टी आणि प्रकाश राज यांची किसान शक्तीच्या मोर्चामुळे ओळख झाली. राजू शेट्टी यांचा सहभाग असलेल्या किसान यात्रेचे दक्षिणेत प्रकाश राज यांनी बंगळुरू आणि मद्रास येथे जोरदार स्वागत केले होते. मोदी विरोधात भूमिका घेणाऱ्या राजू शेट्टी यांना बळ देण्यासाठी प्रकाश राज हातकणंगले मतदारसंघात प्रचार करणार आहेत.
सध्या सगळीकडे निवडणूक प्रचारासाठी सिने कलाकारांना घेत सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका उडविला आहे. सांगलीतही सेलिब्रिटी प्रकाश राज येणार असल्याने येथील निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढणार आहे.