सांगली -प्रसिद्ध डॉक्टर रियाज मुजावर यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, गुरुजी यांच्या उपचारासाठी दाखवलेली कर्तव्य निष्ठा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. सायकलवरून पडल्याने जखमी झालेले संभाजी भिडे यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यादरम्यान त्यांच्या हृदय तपासणीसाठी डॉ. रियाज मुजावर यांनी पुरस्कार सोहळ्याला जाणे टाळत, भिडे यांच्या तपासणीसाठी दाखवलेली कर्तव्य निष्ठा चर्चेचा विषय ठरली आहे.
भिडे गुरुजींच्या तपासणीसाठी, गैरहिंदू डॉक्टरने पुरस्कार सोहळ्याला जाणे टाळले डॉक्टराने पुरस्कार सोहळा टाळला -कट्टर हिंदुत्ववादी, अशी संभाजी भिडे गुरुजी यांची ओळख आहे. भिडे गुरुजींसाठी मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी पुरस्कार प्रदान सोहळयाला जाणे टाळून भिडे गुरुजी यांची हृदय तपासणी केली. काही दिवसांपूर्वी सायकलवरुन चक्कर येऊन पडल्याने संभाजी भिडे गुरुजी यांना दुखापत झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मिरजेच्या भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यादरम्यान त्यांची हृदय तपासणी करणे गरजेचं होतं. याच हॉस्पिटलमध्ये मिरजेचे प्रसिद्ध डॉक्टर रियाज मुजावर हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ज्या दिवशी संभाजी भिडे गुरुजी यांची हृदय तपासणी करणे आवश्यक होतं, त्याच दिवशी डॉक्टर रियाज मुजावर यांना नेल्सन मंडेला यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई या ठिकाणी पार पडणार होता. एका बाजूला संभाजी भिडे गुरुजी यांच्या सारख्या एका व्हीआयपी व्यक्तीची हृदय तपासणी, आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च पुरस्कार प्रदान सोहळा. मात्र डॉक्टर रियाज मुजावर यांनी कर्तव्य आधी या भावनेने पुरस्कार सोहळ्याला जाणे टाळत संभाजी भिडे गुरुजी यांच्या हृदय तपासणीसाठी थांबून राहणं पसंत केलं.
सोशल मीडियावर रंगली उपचाराची चर्चा - सध्या देशभर राज्यभर धार्मिक तणावाचं वातावरण वेगवेगळ्या गोष्टींमुळे निर्माण झालं आहे. अशा स्थितीमध्ये संपूर्ण देशात कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपचारासाठी एक गैरहिंदू डॉक्टरांनी पुरस्कार सोहळ्याला जाणे टाळले.अशा आशयाची पोस्ट सध्या सांगलीच्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यामुळे अनेक स्तरातून डॉक्टर रियाज मुजावर यांचं यानिमित्ताने कौतुक होत आहे.
हे तर कर्तव्य, धार्मिक रंग देऊ नये -सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चेवर मात्र डॉक्टर रियाज मुजावर यांनी खंत व्यक्त केली आहे. आपण डॉक्टर म्हणून निस्वार्थपणे आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारचे धार्मिक अथवा जातीया रंग याला देऊ नये, अशी विनंती रियाज मुजवर यांच्याकडून करण्यात आली आहे.