सांगली- गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीला पूर आला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी तब्बल 35 फुटांवर पोहचली आहे. तसेच वाढलेल्या पाणी पातळीमुळे शहरातील नदीकाठच्या भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे 15 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
सांगलीत कृष्णेची पाणीपातळी पोहचली 35 फुटांवर; नदीकाठच्या सखल भागात शिरले पाणी - आपत्कालीन परिस्थिती
मुसळधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीला पूर आला आहे. तसेच वाढलेल्या पाणी पातळीमुळे शहरातील नदीकाठच्या भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे 15 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
पाणीपातळी वाढल्याने कर्नाळ रोड, दत्तनगर आणि सूर्यवंशी प्लॉट या भागात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांचे महापालिका शाळा नंबर २५ मध्ये स्थलांतर सुरू आहे. तसेच नदीकाठी असणाऱ्या दत्तनगर भागातील नागरिकांना सर्तकच्या सूचना देण्यात आल्या आहे. मध्यरात्रीपासून सांगली महापालिका यंत्रणा आणि अग्निशमन विभाग आणि आपत्ती नियंत्रण कक्ष पूर असलेल्या भागात मदतकार्यामध्ये सक्रिय आहे. त्याचप्रमाणे ज्या भागात पुराचे पाणी येत आहे तेथील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. शिवाय आपत्कालीन परिस्थिती नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पाणीपातळी वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे यासाठी महापालिका यंत्रणा मदत करेल असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. पुराचे पाण्यामुळे शहरातील नांद्रे -पलूस मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नांद्रे-पलूस मार्ग बंद झाला आहे.