सांगली - एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या बहाण्याने कडेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने एका २८ वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विपीन हसबनीस, असे त्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पीडित तरुणीने या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एप्रिल महिन्यात लॉकडाऊन दरम्यान वाळवा तालुक्यातील कासेगाव याठिकाणी बस स्टँडवर पीडित तरुणी आपल्या आजीसोबत थांबली होती. त्यावेळी पोलीस निरीक्षक हसबनीस हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पीडित तरुणीला कुठे निघाला आहात अशी विचारणा केली असता, कराडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर हसबनीस यांनी लॉकडाऊन असल्याने गाडी मिळणार नसल्याचे सांगत आपल्या गाडीतून सोडतो, असे सांगितले. यानंतर पीडित तरुणी आपल्या आजीसह पोलीस निरीक्षक हसबनीस यांच्या गाडीत बसली आणि ते तिघेही कराडकडे निघाले.