सांगली - जत नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. सभागृहात नगरसेवकांच्या झालेल्या वादावादीनंतर पालिकेच्या बाहेर कार्यकर्त्यांमध्येही राडा झाला आहे. नगरपालिकेच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी दोन्ही नगरसेवकांसह आठ जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेची व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सांगली नगरपालिकेमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. भाजपचे उमेश सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सभापती लक्ष्मण उर्फ टिमु एडके यांच्यामध्ये बुधवारी महासभेच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील विकास कामांवर वादावादीचे प्रकार घडला. दोघांमध्ये झालल्या शाब्दिक चकमकीचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, सभागृहातील इतर नगरसेवकांनी या दोन्ही नगरसेवकांमध्ये मध्यस्थी करून हा वाद मिटवला. मात्र, या घटनेची माहिती दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांना कळताच दोन्ही गटाचे समर्थक नगरपालिकेच्या बाहेर जमलेआणि काही वेळात दोन्ही नगरसेवक पालिकेच्या बाहेर येताच, पुन्हा या दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये वादावादी होऊन तुंबळ हाणामारी झाली.