सांगली - शहरातील एका पूरग्रस्त मदत केंद्रावर भाजप नगरसेविका गीता सुतार व पूरग्रस्तांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. या हाणामारीमध्ये 2 जण जखमी झाले आहेत. शहरातील मराठा सेवा संघ येथे हा प्रकार घडला. यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला.
सांगलीत पूरग्रस्त मदत केंद्रावर भाजप नगरसेविका व पूरग्रस्तांमध्ये राडा, दोन जखमी
सांगली शहरातील एका पूरग्रस्त मदत केंद्रावर भाजप नगरसेविका गीता सुतार व पूरग्रस्तांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. या हाणामारीमध्ये 2 जण जखमी झाले आहेत. शहरातील मराठा सेवा संघ येथे हा प्रकार घडला. यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला.
शहरातील पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्र असणाऱ्या शहरातील मराठा सेवा संघ कार्यालयाच्या ठिकाणी भाजप नगरसेविका आणि पूरग्रस्तांमध्ये हा हाणामारीचा प्रकार घडला. या केंद्रात पूरग्रस्तांना देण्यात येणारी मदत मिळत नसल्याच्या तक्रारीवरून या प्रभागाच्या भाजपच्या नगरसेविका गीता सुतार या ठिकाणी पोहोचल्या. यावेळी येथील पूरग्रस्तांची त्यांनी याबाबतची विचारणा सुरू केल्यानंतर या ठिकाणी गोंधळ उडाला. यानंतर नगरसेविका सुतार व त्यांचे कार्यकर्ते आणि या ठिकाणी असणाऱ्या पूरग्रस्तांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडून एकमेकांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.
जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नगरसेविका सुतार या येथील पूरग्रस्तांना फूस लावून देण्यात येणारी मदत उधळून लावण्याचा डाव करत असल्याचा आरोप पूरग्रस्त महिलांनी केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून या मराठा सेवा संघाच्या कार्यालयांमध्ये जवळपास सहाशे पूरग्रस्त असून आठ दिवसानंतर काही नागरिक पूर ओसरल्याने आपल्या घरी परतत आहेत. नागरिकांना मराठा सेवा संघाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप सुरू असताना हा प्रकार घडला.