सांगली- नशेबाज मुलाच्या नाहक मागण्यांच्या त्रासाला कंटाळून एका बापाने आपल्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न करत हल्ल्याचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये घडला आहे. या प्रकरणी राजेंद्र गाडेकर या शिक्षक पित्याला अटक करण्यात आली आहे, तर यामध्ये दुर्दैवाने फिर्यादी या त्यांच्या पत्नी आहेत. जखमी प्रतीक गाडेकर याच्यावर उपचार सुरू आहेत.
आपल्या खात्यावर साडे तीन लाख रुपये जमा करावे, बंगला नावावर करावा, अशा मागण्यांच्या तगादयामुळे राजेंद्र गाडेकर यांनी हे पाऊल उचलले आहे. सांगलीच्या १०० फुटी रोड येथील रामकृष्ण परमहंस सोसायटी येथे राहणाऱ्या राजेंद्र हिंदुराव गाडेकर यांनी आपला मुलगा प्रतीक गाडेकर (वय २२) याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुलगा प्रतीक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मिरजेच्या मिशन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, मुलाच्या खुनाच्या प्रकरणी राजेंद्र गाडेकर यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षक असणारे राजेंद्र गाडेकर, त्यांची पत्नी वैशाली गाडेकर व अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा त्यांचा एकुलता एक मुलगा प्रतीक हे तिघेजण रामकृष्ण परमहंस सोसायटी येथील स्वप्नपूर्ती बंगल्यात राहतात. प्रतीक हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने आई-वडिलांना त्याला लाडाने वाढवले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रतीक हा नशेच्या आहारी गेला होता आणि यातून प्रतीक हा वडील राजेंद्र गाडेकर यांच्याकडे त्याच्या बँक खात्यात साडे तीन लाख रुपये जमा करत बंगला नावावर करण्याची मागणी करत होता. तसेच यावरून प्रतीक आपल्या आई-वडीलांशी वाद घालत होता. यावर आई-वडिलांनी अनेकवेळा प्रतिकला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंमली पदार्थाच्या सेवनाच्या आहारी गेलाला प्रतीक हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.