सांगली -शेतकऱ्यांनी आता वितरण आणि विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी अधिकचे प्रयत्न केले पाहिजे, यासाठी आम्हीही लवकरच एकत्र बसू,अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली आहे, सांगलीच्या आटपाडीमधील खाणजोडवाडी येथील निर्यातक्षम डाळिंब बागांची पाहणी प्रसंगी ते बोलत होते. अतिवृष्टीच्या तडाख्यातही फुलवलेल्या डाळींब पाहण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे कौतुक करण्यासाठी पवार यांनी ही सदिच्छा भेट दिली.
सांगलीच्या आटपाडी तालुक्यात गेल्या तीन महिन्यात अतिवृष्टीमुळे जवळपास 80 टक्के डाळिंब बागा उध्वस्त झाल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये निसर्गाशी दोन हात करत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडी येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी 200 हेक्टर क्षेत्रावर निर्यातक्षम डाळींब उत्पादन घेतले आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये घेतलेल्या या डाळिंबाच आणि तेथील शेतकऱ्यांचे कौतुक करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार थेट खानजोडवाडीमध्ये शुक्रवारी पोहोचले होते. गावातील फुललेल्या निर्यातक्षम डाळिंब बागांची शरद पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांकडून या डाळिंबाच्या बाबत माहिती घेतली. यावेळी त्यांच्या सोबत जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फळ पीक विमा निकष बदलण्याबाबत सरकार गंभीर -
जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, यंदा डाळींब बागांचे आटपाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशा स्थितीमध्ये विमा मिळण्यात अडचणी येत आहेत. तर विमा कंपन्या विमा देण्यास निकष लावत आहेत, ज्या अटीवर विमा काढून दिला आहे, ते सर्व नियम विमा कंपन्याच्या सोयीचे असल्याचे दिसत आहे, त्यामुळे ते निकष बदलण्यासाठी सरकारने गंभीरपणे लक्ष घातले आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
पाणी असले की लाव ऊस..
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बोलताना आज पाणी असले की ऊसाचे कांडे लावले जाते, सगळे ऊसाच्या मागे जातात, जिथे पाणी कमी तिथेही ऊस लावतात आणि नंतर उत्पादन कमी आले म्हणून ओरडतात. मात्र आता कमी पाण्यात पैसे देणारे पीक फळबाग शिवाय पीक नाही, हे समोर आले आहे. असा टोला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पवारांनी लगावला आहे.
खानजोडवाडीकारांचे कौतुक..
दुष्काळी भागातील माणूस कधी उपाशी मरणार नाहीत. कारण तो प्रचंड कष्ट करणारा आहे.आणि आटपाडी तालुक्यातील डाळींब उत्पादक शेतकाऱ्यांनी ते करून दाखवले आहे.खानजोडवाडी येथील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत फुलवलेल्या डाळींब बागा या नक्की कौतुकास्पद आहेत. हे गाव निर्णय घेताना एकजुटीने घेता, एकत्रित कामाची अंमलबजावणी करण्याचे सूत्र राज्यातील शेतकऱ्यांसमोर निर्माण केले आहे. त्यामुळे यशस्वी उत्पादन घेतले आहे, असे गौरवोद्गार शरद पवारांनी खानजोडवाडी येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत काढले आहेत.