सांगली -ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी पडली आहे. रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने मिरज तालुक्यातील ऊसतोड बंद पाडत कर्नाटक राज्यातील कारखान्यांकडे जाणारा ऊस रोखला आहे. तसेच शेतकऱ्याच्या ऊसाला 4 हजार रुपये एफआरपी जाहीर करावा, अन्यथा एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला.
महाराष्ट्रात अजून ऊसगाळप हंगाम सुरू झालेला नाही. मात्र, सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कर्नाटक राज्यात कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणात मिरज तालुक्यात ऊसतोड सुरू आहे. मात्र, अद्यापही महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये उसाचा एफआरपी जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेने ऊस आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आज (शनिवारी) ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये पडली. रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने बेडग नजीकच्या वड्डी येथे सुरू असलेली ऊसतोड बंद पाडली आहे.