सांगली -लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शेती मशागतीसाठी पैसे नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. साखर कारखान्याच्या ऊस बिलाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये आलेल्या महापुराच्या प्रलयाने कित्येक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतातील पिके कुजून गेली होती, तर शासनाकडून त्याचा अद्याप मोबदलाही मिळाला नाही. यातून शेतकरी कसाबसा सावरतोय तोपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर गेल्या दीड महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले.
लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत; पैशांविना मशागती खोळंबल्या
पंधरा वीस दिवसानंतर पेरण्या सुरू होणार आणि वारणा पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या अजूनही शेतीच्या मशागती पैशाविना रखडल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
भाजीपाला मार्केट बंद झाल्याने पुन्हा शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. कारण सध्या पंधरा वीस दिवसावर खरीप हंगाम सुरू होत असून शेतकऱ्यांची शेती मशागतीसाठी सुरुवात झाली आहे. पण मशागत करण्यासाठी पैशे नसल्याने शेतकरी हताश झाल्याचे चित्र सध्या वारणा पट्ट्यातून दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांचा ऊस जानेवारी महिन्यामध्ये कारखान्याला गेला. त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये बिले मिळत होती. यामुळे शेतीची मशागत व बी-बियाण्यांसाठी पैसे उपलब्ध होत होते. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे वारणा साखर कारखान्याचे व बाहेरील इत्तर कारखान्याचे ऊस बील अजूनही मिळाले नसल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
पंधरा वीस दिवसानंतर पेरण्या सुरू होणार आणि वारणा पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या अजूनही शेतीच्या मशागती पैशाविना रखडल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन वारणा साखर कारखान्याची ऊस बिले मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याची शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. मागील हंगामातही वारणा साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना दहा महिने लेट बिले मिळाली होती, तर चालू हंगामात सुद्धा काही शेतकऱ्यांचा ऊस जानेवारी महिन्यामध्ये जाऊनही अद्याप बिले मिळाली नसल्याने व पेरणीचा हंगाम ही लवकरच सुरू होणार असल्याने शेतकरी वर्ग कारखान्याकडून मिळणाऱ्या बिलाची आतुरतेने वात पाहत आहे. सालभर दिवस रात्र काबाडकष्ट करून भरमसाठ किमतीची लागवडी घालून शेतात पीक पिकवायचे आणि तोडणीसाठी शेती मदतनीस अधिकाऱ्याच्या ऑफिसच्या पायऱ्या झिझवायच्या मग कुठे तोड मिळते आणि ऊस तुटून गेला की सहा महिने बिलाची वाटत पाहत बसायचे. यामुळे सध्या पैशामुळे पेरणीचा हंगाम वाया जातोय की काय, या चिंतेत शेतकरी वर्ग आहे.