सांगली - ब्रह्मनाळ येथे महापुरात बोट उलटून घडलेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला एक महिना उलटला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या चौकशीच्या घोषणेचे काय झाले? चौकशी बासनात गुंडाळून ठेवली आहे का? दोषींना सरकार वाचवत तर नाही? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांना न्याय मिळणार का? असा सवालही उपस्थित होत आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हे सर्व होत असताना 8 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ याठिकाणी घडली होती. महापुरात नागरिकांना वाचवताना बोट पलटी होऊन 17 जणांचा मृत्यू झाला होता. यात दीड महिन्याच्या मुलीसह 16 महिला आणि एक वृद्धाचा यामध्ये बुडून मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता.
ब्रम्हनाळ गावात पाणी वाढत असताना गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केलेली बोटींची मागणी, मागणीला प्रशासनाने केलेले दुर्लक्ष, अशा सर्व गोष्टी समोर आल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाच्या निद्रिस्त व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले होते. तर सतरा जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला होता.
मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशाला केराची टोपली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, सांगलीत येऊन ब्रम्हनाळ घटनेची स्वतः सखोल चौकशी करून, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यालाच अनुसरून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीसुद्धा या दुर्घटनेची चौकशी होऊन जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची गय केली जाणार नाही, अशी वलग्ना केली होती.
मात्र, या दुर्घटनेला एक महिना उलटून गेला आहे आणि अद्याप कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा या प्रकरणात दोषी कोण? हे समोर येऊ शकलेले नाही. तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली मिळाली, की प्रशासनाला वाचवण्यासाठी चौकशी बासनात गुंडाळून ठेवला? हा प्रश्न निर्माण झाला आहे.