जत(सांगली)- जत तालुक्यातील कुडणूर गावात कोरोनाची भीती पसरली आहे. गावात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच तेथील सर्व नागरिकांची तपासणी करण्यासाठी पथक नेमल्याचेही माहिती डफळापुरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चोथे यांनी दिली.
त्या 8 जणांचे मृत्यू इतर कारणांमुळे-
या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रशांत आवटे व तहसीलदार सचिन पाटील यांनी बुधवारी कुडणूर गावास बुधवार भेट देत माहिती घेतली. प्रांताधिकारी प्रशांत आवटे म्हणाले की, कुडणूर गावात ज्या आठ नागरिकांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली. गावचे सरपंच, पोलीस पाटील व इतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांचे मृत्यू इतर कारणाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गावातील कोणत्याही नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
तसेच गावातील २४ नागरिकांच्या कोरोनाच्या चाचणी केल्या असता, एकही पॉझिटीव्ह व्यक्ती निघाली नाही. ज्यांना ताप,अंगदुखी किंवा इतर आजार असतील अशांच्या तपासण्या करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच ज्या आठ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या घरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.