सांगली : सध्या राज्यात एक दिवसाआड ईडीकडून छापे टाकले जात आहेत. नुकतीच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सचिव सूरज चव्हाण यांच्या घरावर ईडीने धाड टाकली होती. त्यानंतर शुक्रवारी सांगली शहरातील काही व्यापाऱ्यावर ईडीने धाड टाकली आहे. शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या दिनेश व सुरेश पारेख आणि अरविंद व ऋषिकेश लढ्ढा या चार बड्या व्यापाऱ्यांसह पिंटू बियाणी या व्यापाऱ्यावर ईडीच्या पथकांनी छापे टाकून तपासणी केली. आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
व्यापाऱ्यावर ईडीच्या धाडी : ईडीकडून धाडीबाबत प्रचंड गुप्तता ठेवली होती, शहरातील शासकीय रुग्णालयामागे त्रिकोणी बागेसमोर राहणाऱ्या दिनेश पारेख आणि सुरेश पारेख व्यापारी बंधूंच्या शेजारी-शेजारी बंगले आहेत. दोघेही इलेक्ट्रिक साहित्याचे मोठे पुरवठादार आहेत. दोघांच्या घरांवर शुक्रवारी सकाळी 7 वाजता एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्यानंतर काही वेळातच न्यू प्राइड मल्टिप्लेक्स शेजारच्या व्यंकटेशनगरातील अरविंद आणि ऋषिकेश लढ्ढा या इलेक्ट्रिक साहित्याच्या व्यापाऱ्यांच्या घरांवरही पथकांचे छापे टाकण्यात आले. या पाच व्यापाऱ्यांकडे चौकशी करताना ईडीने व्यापाऱ्यांची खाती असलेल्या बँकेत देखील जाऊन चौकशी केली.
बँक खात्यांची चौकशी : ईडीने पारेख बंधूं या व्यापाऱ्यांच्या घरासह त्यांच्या बँक खात्यांची चौकशी केली. यात पारेख बंधूंची एकाच बँकेत जवळपास 40 ते 42 खाती कुटुंबातील आणि वेगवेगळ्या फर्मच्या नावे असल्याचे समोर आले. तर यामध्ये पेठ येथील राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातही जाऊन ईडीच्या एका पथकाने पारेख बंधूंच्या खात्याबाबाबत चौकशी केली. बँकेचे अध्यक्ष शामराम पाटील यांनीही याला दुजोरा दिला आहे. शुक्रवारी ईडीचे अधिकारी दिवसभर सांगली शहरात होते. सुमारे 60 आधिकाऱ्यांच्या पथकाकडून हे छापेमारी करण्यात आली. सकाळी 8 पासून सुरू असलेले छापे आणि चौकशी मध्यरात्री अडीच वाजता संपली. त्यानंतर ईडीचे अधिकारी संपूर्ण चौकशी आटपून मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान या व्यावसायिकांवर काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांची आर्थिक अनियमिनता केल्यामुळे सीमा शुल्क आणि व्हॅटच्या पथकांनी छापे टाकले होते. तर जीएसटी विभागाने कर वसूल केल्याची माहिती मिळाली आहे. या व्यावसायिकांवर चौथ्यांदा केंद्रीय पथकांचे छापे पडले आहेत.
हेही वाचा -
- COVID 19 Jumbo Centers Scam: 100 कोटींची संपत्ती ईडीच्या रडारवर...आयएएस संजीव जयस्वाल यांनी ईडीकडे मागितला चार दिवसांचा वेळ
- ED Raid in Mumbai : कोव्हिड सेंटरमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणात ईडीची दोन दिवस कारवाई, आतापर्यंत काय घडले?