सांगली- दुष्काळी चारा छावण्यासाठी सांगलीतील व्यापारी आणि विविध सामाजिक संघटना सरसावल्या आहेत. छावण्यातील जनावरांना आज 10 टन पशुखाद्य देण्यात आले आहे. सरकारकडून जनावरांना अल्पखाद्य देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पशुधन सुदृढ राहण्यासाठी सांगलीच्या व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
दुष्काळाच्या झळा; जनावरांच्या चाऱ्यासाठी दानशूर सरसावले, दिले 10 टन पशुखाद्य - सरकार
छावण्यातील जनावरांना आज 10 टन पशुखाद्य देण्यात आले आहे. सरकारकडून जनावरांना अल्पखाद्य देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पुढे येत चारा छावणीला १० टन पशुखाद्य दिले.
![दुष्काळाच्या झळा; जनावरांच्या चाऱ्यासाठी दानशूर सरसावले, दिले 10 टन पशुखाद्य](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3295048-1108-3295048-1557986651546.jpg)
सांगलीतील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती बिकट बनली आहे. पाणी आणि चाराटंचाई यामुळे उपलब्ध पशुधन जगवणे कठीण झाले आहे. सरकारकडून चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. त्याठिकाणी सरकारी नियमांमुळे जनावरांना अपुऱ्या प्रमाणात चारा आणि विशेषतः खाद्य कमी प्रमाणात मिळत असल्याने जनावरांच्या सुदृढतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता हे पशुधन वाचवण्यासाठी सांगलीतील भारतीय जैन संघटना, विविध व्यापारी संघटना आणि सामाजिक संघटना दुष्काळामुळे होरपळणाऱ्या जनावरांच्या मदतीला धावल्या आहेत. तब्बल 10 टन उच्च दर्जाचे खाद्य आज छावणीतील जनावरांसाठी पाठवण्यात आला आहे.
सांगलीचे माजी महापौर व अनिमल वेल्फेअर बोर्ड दिल्लीचे महाराष्ट्र प्रतिनिधी सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत पशुखाद्याचे ट्रक रवाना झाले आहेत. यापैकी 5 टन आटपाडी तालुक्यातील तडवळे व 5 टन पशुखाद्य हे आवळाई येथे रवाना करण्यात आले आहे. सदर पशुखाद्याचे प्रत्यक्ष चारा छावणीमध्ये वाटप करण्यात येणार आहे. पशुधन वाचवण्यासाठी व्यापारी, सामाजिक संस्थानी मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.