सांगली - सांगलीच्या शासकीय रुग्णालयात बंद अवस्थेत असलेल्या ऑक्सीजन प्लान्ट तातडीने सुरु करण्याच्या मागणीसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आले, बंद असलेल्या ऑक्सिजन प्लांटवर शेणकुट थापत निषेध नोंदवण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी सांगली शासकीय रुग्णालयाच्या आवारात जिल्हा प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आला आहे. मात्र हा ऑक्सीजन प्लान्ट अद्याप कार्यान्वित झालेला नाही.सांगली जिल्ह्यासह राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. अशा या स्थितीमध्ये सांगली शासकीय रुग्णालयातील ऑक्सीजन प्लान्ट हा सुरू असता तर रुग्णांना दिलासा मिळाला असता, असं मत व्यक्त करत मदन भाऊ पाटील युवा मंचच्यावतीने बंद असलेला ऑक्सीजन प्लान्ट तातडीने सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. बंद अवस्थेत असलेल्या या ऑक्सीजन प्लान्टवर मदन भाऊ पाटील युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी शेणकुट थापत निषेध नोंदवला आहे.
प्लान्टला शेण फासत नोंदवला निषेध-
मदन भाऊ पाटील युवा मंच अध्यक्ष आनंदा लेंगरे म्हणाले, राज्यात आज ऑक्सिजनची मोठी भीषण परिस्थिती आहे. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. राज्य शासनाने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात लिक्विड ऑक्सीजन प्लान्ट उभा केला. त्यासाठी संबंधित ठेकेदाराला 70 टक्के पैसे अदा केले आहेत. मात्र किरकोळ कारणांमुळे अद्यापही हा ऑक्सीजन प्लान्ट सुरू होऊ शकलेला नाही. एकीकडे राज्य शासन परराज्यातून ऑक्सिजन आणत आहे, अशी परिस्थिती असताना मात्र रुग्णालयाच्या आवारात असणारा हा ऑक्सीजन प्लांट बंद अवस्थेत असल्यामुळे अनेक रुग्णांना ऑक्सीजनसाठी तडफडावे लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने याची दखल घ्यावी आणि तातडीने प्लान्ट सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कार्यवाही न झाल्यास या पुढील काळात तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही यावेळी आनंदा लेंगरे यांनी दिला आहे.