सांगली - गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः सांगली जिल्ह्याला झोडपून काढले आहे. त्याचा मोठा फटका जिल्ह्यातील द्राक्ष बागांना बसला आहे. जवळपास आठ हजार हेक्टरहून अधिक द्राक्षबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. यामुळे आधीच अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांवर संकटांचे डोंगर कोसळले आहे.
अवकाळीचा द्राक्षबागांना फटका
जिल्ह्यामध्ये सुमारे 31 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस, द्राक्ष बागायत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण अवकाळी पावसामुळे द्राक्षबाग उद्ध्वस्त झाली आहे. सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. घडकुज, मणीगळ, मणी क्रॅक तसेच, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे, द्राक्षबाग शेतकरी हवालदिल झाला आहे.
एका रात्रीत होत्याचे नव्हते
अवकाळीचा फटका वाळवा तालुक्यातले द्राक्ष उत्पादक शेतकरी आशिष मगदूम यांना मोठा प्रमाणात बसला आहे. एकाच रात्रीत हातातोंडाशी आलेली दीड एकर बाग कोसळली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मगदूम यांची द्राक्ष शेती वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांमुळे वाया गेली आहे. या वर्षी त्यांना चांगले उत्पादन येईल, अशी अपेक्षा होती. जवळपास साडेसहा लाख रुपये खर्चून त्यांनी ही बाग उभारली होती. काही दिवसांत ही द्राक्ष विक्रीसाठी उपलब्ध होणार होती, मात्र एकाच रात्रीत 18 टन द्राक्ष उत्पादन अपेक्षित असणाऱ्या मगदूम यांची बाग अवकाळीच्या कहरामुळे जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे, वारंवार संकटात सापडलेल्या मगदूम यांनी शासनाला मदतीची याचना केली आहे.