सांगली- जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाच्या ३० टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ दोन लाख हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या असून पावसाअभावी ७८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी करणे बाकी आहे. तर दोन आठवड्यापासून समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पिके न उगवल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.
पावसाअभावी ३० टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या जिल्ह्यात यंदा २ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होणार आहे. मात्र जून महिना संपला तरी फक्त दोन लाख हेक्टर क्षेत्रात खरीपाच्या पेरण्या झाल्या आहे. यामध्ये सोयाबीन, मका, भुईमूग, भात, तुर, नाचणी, उडीद, मूग आदी पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पेरणी केलेले खरिपाचे पिके वाया जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- घरगुती वीज ग्राहकांची वीजबिले माफ करा, जनता दलाची मागणी
जिल्ह्यात यावर्षी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे, मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने जवळपास ७८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या झाल्या नाहीत, त्यामुळे जिल्ह्यातील ३० टक्के क्षेत्र पेरणीविना रिकामे आहे. तर पावसाने दडी मारल्याने पेरणी होउनही पिके उगवली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर येणार आहे.
जिल्ह्यातला पश्चिम आणि डोंगरी भाग म्हणून ओळख शिराळा तालुक्याची ओळख आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण मान नेहमीच अधिक असते. त्यामुळे याठिकाणी प्रामुख्याने भात पिकाची पेरणी अधिक असते आणि यंदा भात पिकाची चांगली पेरणी झाली असून जून महिन्याअखेर जवळपास १२ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.