महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीचे 'ड्रॅगन फ्रुट' दुबईच्या बाजारपेठेत.. 'कमलम' निर्यात करण्याचा मान कडेगावमधील दोन शेतकऱ्यांना - कमलम फळ

विविध आजारांबरोबर ‘ड्रॅगन फ्रूट’ याचीही आपल्याकडे मोठी चर्चा होऊ लागली. थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल, श्रीलंका आदी देशांत लोकप्रिय असलेल्या या फळाची आता भारतातही यशस्वी लागवड होऊ लागली आहे. सांगली जिल्हय़ातील कडेगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूट फळबागेतील दाखवलेला हा नवा मार्ग कौतुकाचा विषय झाला आहे. तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूट परदेशात निर्यात करण्यामध्ये देशातील पहिले शेतकरी असल्याचा मान मिळवला आहे.

dragon-fruit-farming-in-sangli
dragon-fruit-farming-in-sangli

By

Published : Jul 2, 2021, 8:11 PM IST

सांगली - सांगलीचे "ड्रॅगन फ्रुट"आता दुबईत पोहोचले आहे. भारतातून"ड्रॅगन फ्रुट"ची परदेशात विक्री करणारे कडेगाव तालुक्यातील दोन शेतकरी देशातील पहिलेच ठरले आहेत. पहिल्यांदाच 100 किलो ड्रॅगन फ्रुट निर्यात झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील ड्रगन फ्रुटची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन आशा मिळाली आहे.

सांगलीचे ड्रॅगन फ्रुट पोहचले दुबईत..

दुष्काळी भागात ड्रॅगन फ्रुट हे फळपीक शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. सांगली जिल्ह्यात जवळपास दीडशे एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली जात आहे. जत आणि आटपाडी भागात या ड्रॅगन फ्रुट पिकाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये कडेगाव तालुक्यातही ड्रॅगन फ्रुटची शेती करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून तडसर येथील आनंदराव पवार आणि वांगी येथील राजराम देशमुख या दोन शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती करत सांगली जिल्ह्यातून 100 किलो ड्रॅगन फ्रुट दुबईस निर्यात केले आहेत. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे मोहक "ड्रॅगन फ्रुट" दुबईकारांच्या पसंतीसही उतरले आहे.

कमलम' निर्यात करण्याचा मान कडेगावमधील दोन शेतकऱ्यांना
कडेगावच्या शेतकऱ्यांची यशस्वी "ड्रॅगन फ्रुट" लागवड..
ड्रॅगन फ्रुटची शेती ही कमी पाण्यात केली जाते, त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात आतापर्यंत याला पसंती होती. मात्र आता द्राक्ष आणि ऊस पट्ट्यातही ड्रॅगन फ्रुटची शेती द्राक्ष आणि ऊसाला पर्याय देणारी ठरली आहे. या फळ शेतीने आपली किमया साध्य करून दाखवली आहे. कडेगाव तालुक्यातील तडसर आणि वांगी येथील दोन शेतकऱ्यांनी या फळाची यशस्वी शेती केली आहे. तडसर येथील जेष्ठ शेतकरी आनंदराव पवार यांनी आपल्या 25 गुंठयात तर वांगी येथील राजाराम देशमुख यांनी दीड एकर क्षेत्रात यशस्वी लागवड करत ड्रॅगन फ्रुटचे भरघोस उत्पादन घेतले आहे.
ऊस आणि द्राक्षेला "ड्रॅगन फ्रुट" पर्याय..
तडसरचे ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकरी आनंदराव पवार म्हणाले, जत तालुक्यातील येरळा येथील अधिकारी देशपांडे आणि वेळापूर येथील आप्पा यांनी आपल्याला पहिल्यांदा ड्रॅगन फ्रुटच्या शेतीबद्दल माहिती दिली. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील पिलीव या ठिकाणी जाऊन आपण प्रत्यक्ष ड्रॅगन फ्रुटची शेती पाहणी केली. त्यानंतर काही वर्ष याबाबतचा अभ्यास केला आणि 2016 मध्ये पहिल्यांदा आपल्या 25 गुंठे क्षेत्रात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. यानंतर पहिल्या वर्षी चरीचे अंतर कमी असल्याने उत्पादन कमी आले, मात्र त्यानंतर सुधारणा केल्यानंतर दर वर्षी उत्पादन वाढत गेले. गेल्या वर्षी साडेसात टन इतके उत्पादन झाले. यावर्षी दहा टन उत्पादन होईल, असा अंदाज आहे. कमी पाण्यात, कमी वेळेत व कमी खर्चात शेतकऱ्यांना अधिक नफा देणारे हे पीक आहे. आता आपल्या शेतामध्ये जवळपास 500 ग्रॅम वजनाची ड्रॅगन फ्रुट्स उत्पादन होत आहेत. अशा या ड्रॅगन फ्रुटची यंदा आपण दुबईमध्ये निर्यात केली आहे. भारतातून ड्रॅगन फ्रुट निर्यात करणारे आपण पहिलेच शेतकरी असल्याचा दावा आनंद पवार यांनी केला आहे.
कमलम' निर्यात करण्याचा मान कडेगावमधील दोन शेतकऱ्यांना
"कमलम "शेतकऱ्यांना आशेची नवी किरण -
भारत सरकारने नुकताच ड्रॅगन फ्रुटला "कमलम" असे नाव दिले आहे. कमळाच्या फुलाचा आकार असल्याने केंद्र सरकारकडून या ड्रॅगन फ्रुटला "कमलम" असे नाव देण्यात आले आहे. ड्रॅगन फ्रुट हे फळ रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे काम करते, त्यामुळे या फळाला सध्या चांगली मागणी आहे. तसेच दुष्काळी भागाच्या बरोबर सधन भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ड्रॅगन फ्रुट अर्थात "कमलम" हे फळपीक आशेची नवी किरण देणारे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details