सांगली - मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार इस्लामपुरात उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक व मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी आरोपीला बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती. गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. डॉ. योगेश रंगराव वाठारकर (रा. वाळवा, इस्लामपूर) असे या आरोपीचे नाव आहे. रुग्णालयाच्या बिलासंदर्भात किंवा आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर योग्य कागदपत्र घेऊन पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे.
डॉ. योगेश वाठारकर याच्यावर 2018ला रुग्णालयात अपघाताने मृत झालेल्या रुग्णांची माहिती पोलिसांपासून लपवल्याचा गुन्हा दाखल आहे. इस्लामपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल असून हे प्रकरण न्यायालयात आहे. कोरोनाच्या सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड रुग्णांची उपचारासाठी आधार हॉस्पिटलची नियुक्ती केली. डॉ. वाठारकरने या आदेशाला न जुमानता नॉनकोविड रुग्णाचे उपचार सुरू केल्याचे निदर्शनास आले. यामुळे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरणही न्यायालयात आहे.