सांगली- नितीन गडकरी यांनी साखर कारखानदारांना ईथेनॉल निर्मिती करण्याचे आवाहन केले होता. यावर गडकरी आणि त्यांच्या पक्षाच्या एका तरी नेत्याच्या कारखान्यात ईथेनॉल निर्मिती सुरू आहे का ? असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. पुण्यातील साखर परिषद ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून केवळ राजकीय परिषद होती, असा आरोप करत पुढील हंगामात ऊस दरासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारादेखील पाटील यांनी दिला आहे. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्राचे साखर उद्योग धोरण, पुण्यात पार पडलेली साखर परिषद आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सडकून टीका केली. आज पाटील यांनी शहरात पत्रकार परिषद घेऊन देशातील साखर उद्योग अडचणीत येणास केंद्र सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच पुणे येथे पार पडलेल्या साखर परिषदेवर टीका करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि राज्यातील साखर कारखानदार यांच्या उपस्थितीत शेतकरी उपयोगी धोरण आणि त्यांच्या हितावर चर्चा न करता, याउलट शेतकऱ्यांना लुटण्यासाठी साखर कारखानदारांना सोबत येण्याचा एक प्रकारचा दबाव टाकण्याचे काम या परिषदेत झाले आहे.