सांगली -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. वाळवा या ठिकाणी पहिल्यांदा फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वडर गल्ली, कैकाडी वस्ती, बौद्ध वसाहत परिसरातील पूरबाधित भागाची पाहणी करत, पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनबरोबर अधिक मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांचा सांगली पूरस्थिती पाहणी दौरा पुनर्वसन आणि मदतीसाठी प्रयत्न करणार -
यावेळी वारंवार येणाऱ्या महापुरामुळे जर दरवर्षी नुकसान होणार असेल, तर कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशी मागणी येथील नदीकाठच्या पूरग्रस्तांनी केली. याबाबत फडणवीस यांनी राज्य सरकारकडून अधिक मदत पूरग्रस्तांना कशी मिळेल तसेच पुनर्वसन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपाच्यावतीने पूरग्रस्तांना धान्य किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सांगलीतून कोल्हापूर दौऱ्याकडे रवाना -
देवेंद्र फडणवीस वाळवा तालुक्यातल्या अंकलखोप या ठिकाणी रवाना झाले आहेत. अंकलखोप तसेच भिलवडी, मिरज तालुक्यातील ढवळी यासह सांगली शहरातल्या सात ठिकाणच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यानंतर ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौऱ्यासाठी सायंकाळी रवाना झाले आहेत.