सांगली - कोरोनाच्या संकटात माणुसकीचा हात आज गरजेचा बनला आहे. प्रत्येकाने आपल्या परीने कुठेतरी समाजाच्या दायित्वाची भूमिका बजावणे आवश्यक बनले आहे. या जाणीवेतून विट्याच्या "देशप्रेमी मंच" या सामजिक संस्थेने "रद्दीतून मदतीची संधी" हा उपक्रम सुरू केला आहे. घरोघरी जाऊन रद्दी गोळी करून ती विक्री करत जमा होणारे पैसे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.
देशप्रेमींची कौतुकास्पद "रद्दी"मदत
विटा शहरातील 'देशप्रेमी मंच' कोरोना रुग्णांच्या मदतीला आता धावुन आला आहे. 'रद्दीतून मदतीची संधी' हा उपक्रम विट्यातील देशप्रेमी मंचकडून हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत घरातील रद्दी, अडगळीत पडलेली पुस्तके मंचच्या सदस्यांच्याकडून घरोघरी जाऊन गोळा करण्यात येत आहेत. ज्यामुळे त्यांच्या घरातील रद्दीचा ढिगारा साफ होण्याबरोबर त्यांना कोरोनाग्रस्तांना मदतीची संधी मिळणार आहे. गोळा झालेली रद्दी विक्री करून त्यातून जमा होणारे पैसे हे कोरोनाग्रस्त व्यक्ती व कुटुंबांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून संकलित होणारी जुनी शालेय पुस्तक व कादंबरी या गरजू विद्यार्थ्यांबरोबर कोरोना सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना वाचनासाठी देण्यात येत आहेत.