सांगली- दुष्काळामुळे यंदा जिल्ह्यातील शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चारा टंचाई आणि भकास बनलेले माळरान यामुळे तब्बल ६ लाख ३१ हजार ७९८ शेळ्या-मेंढ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तर या जनावरांबाबत सरकारकडे कोणत्याही उपयोजना नसल्याने हे पशुधन धोक्यात आले आहे.
दुष्काळामुळे शेळ्या-मेंढ्यांवर उपासमारीची वेळ सांगली दुष्काळी भागातील जत तालुक्यासह आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात सुमारे ६ लाख ३१ हजार ७९८ शेळ्या मेंढ्या आहेत. शेतीसोबत हा जोडधंदा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्यांचे पालन व्यवसाय केला जातो. येथे मोकळे रान अधिक असल्याने मेंढपाळांना पावसाळ्यात चाऱ्याची अजिबात कमतरता पडत नसे. इतर वेळीही चारा उपलब्ध होत असे.
मात्र, यंदाच्या भीषण दुष्काळात शेती बरोबर हा व्यवसायही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण दुष्काळामुळे निर्माण झालेली चारा टंचाई आणि उजाड बनलेली माळराने यामुळे शेळया-मेंढ्यांना गवतसुद्धा मिळणे अवघड बनले आहे. दुसऱ्या बाजूला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या गाई, बैल आणि म्हशी यांच्यासाठी चारा छावण्या सरकारकडून सुरू करण्यात येत आहेत. मात्र, शेळ्या-मेंढ्याच्या बाबतीत सरकारकडून विचार झाला नाही. यामुळे चाऱ्या अभावी शेळ्या-मेंढयांवर उपसमारीची वेळ आली आहे.
अलीकडच्या काही वर्षांत पाऊसमान कमी होत चालल्याने वडिलोपार्जित मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस येत आहे. यंदा तर फारच बिकट अवस्था झाली असून चारा-पाणी नसल्याने मेंढ्या कवडीमोल दराने विकण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. त्यामुळे शासनाने या शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याबाबत विचार करून त्यांच्यासाठी वेगळ्या छावण्या सुरू करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.